
मनसे नेते संदीप देशपांडेंवर हल्ला
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : मॉर्निंग वॉकसाठी दादरच्या शिवाजी पार्कात गेलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर अज्ञातांनी स्टम्पने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या हल्ल्यात देशपांडे जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
देशपांडे शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी एकटेच शिवाजी पार्कमध्ये गेले होते. त्यावेळी शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर चार ते पाच जण बसले होते. त्यांच्या तोंडावर मास्क होते. या टोळक्याने देशपांडे यांच्यावर स्टम्प आणि लोखंडी रॉडच्या साह्याने हल्ला चढवला. टोळक्यातील एकाने देशपांडे यांच्या डोक्यात स्टम्पने प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र हा वार देशपांडे यांनी हातावर झेलला. या झटापटीत एक फटका त्यांच्या पायावर बसला.
हा सर्व प्रकार पाहून आजुबाजूचे नागरिक देशपांडे यांच्या मदतीसाठी धावून आले. त्यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. हल्लेखोर कोण होते, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. हल्लेखोरांच्या तोंडावर मास्क होते. त्यामुळे त्यांची ओळख पटू शकलेली नाही. या घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपासाला सुरुवात केली आहे.