बँक खाते अनेक प्रकल्पांना संलग्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बँक खाते अनेक प्रकल्पांना संलग्न
बँक खाते अनेक प्रकल्पांना संलग्न

बँक खाते अनेक प्रकल्पांना संलग्न

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३ : स्थावर संपदा कायद्यांतर्गत एका नोंदणी क्रमांकाच्या प्रकल्पासाठी एकच बँक खाते असणे बंधनकारक आहे; मात्र जवळपास १७८१ गृहनिर्माण प्रकल्पांनी त्यांची बँक खाती एकापेक्षा जास्त प्रकल्पांशी संलग्न केल्याची अनियमितता महारेराच्या झाडाझडतीत समोर आली. अशा ४५ प्रकल्पांना कारणे दाखवा नोटिशी महारेराने बजावल्या आहेत. तसेच उर्वरित प्रकल्पांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू आहे.

बांधकाम क्षेत्रात अंगभूत शिस्त निर्माण व्हावी, प्रत्येक घर खरेदीकराराची, गुंतवणूकदारांची गुंतवणूक सुरक्षित राहावी तसेच रिअल इस्टेट क्षेत्राची विश्वासार्हता वाढावी यासाठी महारेरा प्रयत्नशील आहे. त्यासाठीच महारेराने हे पाऊल उचलले आहे. भविष्यात असे प्रकार होऊ नये म्हणून एका प्रकल्पाचे पदनिर्देशित खाते दुसऱ्या प्रकल्पाच्या बँक खात्याशी जोडण्याचा प्रयत्न केल्यास त्याला अटकाव होईल, अशा प्रकारचे बदल संगणकीय प्रणालीत करण्यात आले आहेत. त्यामुळे विकसकाने परस्पर खातेबदल करण्याचा प्रयत्न केला तरी तांत्रिकदृष्ट्या शक्य होणार नाही. महारेराने नवीन आदेश काढून हे बदल करण्यासाठी पूर्व परवानगी अनिवार्य केली आहे.

एकच बँक खाते, प्रकल्प सुरक्षित
नियमानुसार एका रेरा नोंदणी क्रमांकासोबत फक्त एकच बँक खाते ठेवणे विकसकाला बंधनकारक आहे. संबंधित प्रकल्पातील नोंदणीपोटी आलेला पैसा फक्त या खात्यात ठेवून त्या प्रकल्पाच्या कामासाठीच तो वापरला जावा. विकसकाला त्या प्रकल्पातील नोंदणीपोटी आलेल्या पैशातील ७० टक्के पैसेही याच खात्यात ठेवणे बंधनकारक आहे. मनमानी पध्दतीने विकसकाला या खात्यातून पैसे काढता येत नाहीत. या शिवाय खात्यातून प्रत्येक टप्प्यावर पैसे काढताना, प्रकल्प अभियंता, प्रकल्पाचे वास्तुशास्त्रज्ञ आणि प्रकल्प ऑडिटर यांचे प्रकल्प किती पूर्ण झाला, किती बाकी आहे, किती पैशांची गरज आहे याबाबतचे प्रमाणपत्र असल्याशिवाय खात्यातून पैसे काढता येत नाहीत.