
आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कट रचून ठार मारण्याच्या उद्देशाने कार्यकर्त्यांमार्फत मारहाण केल्याचा आरोप करत महापालिका सहायक आयुक्त महेश आहेर यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार आव्हाड यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. ठाणे न्यायालयात आव्हाडांनी अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी अर्ज केला होता. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज शुक्रवारी (ता. ३) मंजूर झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. तत्पूर्वीही मुंब्रा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात आमदार आव्हाड यांना दिलासा मिळाला होता.
डॉ. जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाला संपवण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी ऊर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केले, अशी ठाणे पालिकेतील सहायक आयुक्त महेश आहेर यांच्या आवाजातील कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आहेर यांना महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर मारहाण केली. याप्रकरणी आमदार आव्हाड यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर चौघांना नौपाडा पोलिसांनी अटक केली. त्यांचा प्रत्येकी २५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. त्यांच्यानंतर आव्हाड यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. त्यांनी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी अर्ज केला. त्यावेळी त्यांना अंतरिम जामीन मंजूर झाला होता. त्या जामीन अर्जावर मंगळवारी (ता. २८) दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद पूर्ण केला. त्यानंतर न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (ता. ३) निकाल राखून ठेवला होता.