
निधन
डोंबिवली, ता. ३ ः शिवसेनेचे लालबाग-परळ विधानसभेचे माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचे शुक्रवारी (ता. २) डोंबिवलीत निधन झाले. देसाई यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने गुरुवारी सकाळी रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलावली; मात्र ती वाटेतच बंद पडल्याने कुटुंबीयांना रुग्णवाहिकेला धक्का देण्याची वेळ आली. त्यामुळे उपचारासाठी विलंब झाल्याने देसाई यांचे निधन झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. माजी आमदार देसाई यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने गुरुवारी सकाळी त्यांना डोंबिवली पूर्वेतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात येत होते; मात्र वाटेतच रुग्णवाहिका बंद पडल्याने देसाई यांच्या कुटूंबियानी चक्क रुग्णवाहिका धक्का देऊन सुरू करण्याचा प्रयत्न केला; परंतु तोही असफल ठरला. दुसऱ्या रुग्णवाहिकेतून देसाई यांना रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रुग्णवाहिका बंद पडल्याने उपचारास उशीर झाला आणि देसाई यांचा मृत्यू झाला, असा आरोप देसाई यांच्या कुटूंबियांनी केला असून याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
----
नांदगावकर यांना अश्रू अनावर
दरम्यान देसाई यांच्या पार्थिवावर शिवमंदिर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी रात्री देसाई यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. रुग्णवाहिका बंद पडल्याने देसाईंचा मृत्यू होणे ही धक्कादायक बाब आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आली आहे. देसाई यांच्यामुळे माझी कारकीर्द घडली, असे सांगत देसाई यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांना आपले अश्रू अनावर झाले.