पर्यावरणपूरक होळीची परंपरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यावरणपूरक होळीची परंपरा
पर्यावरणपूरक होळीची परंपरा

पर्यावरणपूरक होळीची परंपरा

sakal_logo
By

किरण घरत : सकाळ वृत्तसेवा
कळवा : होळी म्हटली की सर्वसाधारणपणे झाडांची कत्तल, लाकडाच्या ओंडक्यांची धगधगणारी आग आणि होळीभोवती रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या आरोळ्या, असे साधारण गावागावांतील चित्र असते; परंतु यामुळे हजारो झाडांची कत्तल होत असून पर्यावरणाची हानी आणि त्यापासून वाढणारे प्रदूषण असे संकट भेडसावत असते. याची दखल घेऊन कळव्यातील मनीषानगर येथील नगरसेविका अपर्णा साळवी यांनी मात्र या पारंपरिक होळीला छेद देत गेल्या पंधरा वर्षांपासून सायबानगरी क्रीडांगणावर पर्यावरणपूरक होळी सुरू केली आहे. हा आगळावेगळा होलिकोत्सव संपूर्ण ठाणे शहराचे आकर्षण ठरले आहे.
अपर्णा साळवी व त्यांचे कार्यकर्ते होळीच्या दिवशी झाडे न तोडता परिसरातील नारळाच्या सुकलेल्या झावळ्या, सुकलेला कचरा, पालापाचोळा, कागद व वापरण्याजोगे पुठ्ठे आदी गोळा करून त्याची होळी रचतात. ती फुलांनी सजवतात. तिची शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा करून ती कमी उंचीवर पेटवली जाते. होळी सभोवताली ‘पर्यावरण दक्षता मंच’च्यावतीने होळी पेटविण्याआधी व नंतर होणाऱ्या दुष्परिणामांची जनजागृती करण्यासाठी वेगवेगळी भित्तीपत्रके, तक्ते व प्रतिकृतींचे प्रदर्शन भरविले जाते. होळीत नैवेद्य व नारळ न टाकता तो प्रसाद म्हणून सर्वांना वाटला जातो. तसेच दुसऱ्या दिवशी रंगोत्सव साजरा करण्यासाठी शरीराला कोणतीही हानी पोहचू नये म्हणून नैसर्गिक रंग वाटले जातात. रंगपंचमीला फुगे मारले जाऊ नयेत, यासाठी युवकांना मार्गदर्शन केले जाते. सायबानगरी क्रीडांगणावर होळीच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी सात ते साडेबारा वाजेपर्यंत ‘होलिकोत्सव’ रंगतो. मनीषानगर परिसरातील हजारो नागरिक या उत्सवात सहभागी होतात. त्यांच्यासाठी दरवर्षी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. गोड लाडूचेही वाटप केले जाते. अशाप्रकारे आनंदाच्या व खेळीमेळीच्या वातावरणात हजारो लोकांत पर्यावरणपूरक होळी साजरी केली जाते.
----------------------------------------
समाज जनजागृतीचा ध्यास
एका सर्वेक्षणानुसार दरवर्षी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लाकडांची होळी करून त्याची राख केली जाते. त्यामुळे ‘एक गाव एक होळी’ ही संकल्पना बाजूला ठेवून समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन पर्यावरणपूरक होळी साजरी केल्यास परिसरातील लाखो टन कचरा जाळून परिसर स्वच्छ होण्यास मदत होणार आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी त्याचा उपयोग होईल, या हेतूने हा उपक्रम राबविल्याचे नगरसेविका अपर्णा साळवी यांनी सांगितले. सध्या या आपल्या होळीचे अनुकरण करून परिसरातील काही गृहनिर्माण संस्थांनी अशा प्रकारची होळी साजरी करण्याचा मानस व्यक्त केला आहे.