
आगरी-कोळ्यांचा ‘एक गाव, एक होळी’चा नारा
तुर्भे, बातमीदार
आधुनिक काळाच्या ओघात सर्वच सणांचे रूप पालटत असले तरी ‘स्मार्ट सिटी’तील गावांमध्ये सण, उत्सवाची परंपरा पूर्वीप्रमाणेच जोपासली जात आहे. सेक्टर तसेच नोडमधील गल्लीबोळात होळ्या पेटवल्या जात असल्या तरी नवी मुंबईतील आगरी, तसेच कोळीवाड्यांमध्ये ‘एक गाव, एक होळी’ची परंपरा आजही कायम आहे.
-----------------------------------------
आगरी-कोळी बांधव सर्व सणांप्रमाणे होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. आगरी-कोळी भाषेत सांगायचे झाले तर होळी म्हणजे ‘हावलू बायचा’ सण आणि रंगपंचमी म्हणजे ‘शिमगा’ म्हणून ओळखला जातो. या सणानिमित्त जावईबापूंचा सन्मान करण्याची प्रथा आजही नवी मुंबई शहरात टिकून राहिली आहे. या सणाला गावात होळीच्या आधी ज्या मुलींची नवीन लग्ने झाली असतील त्या नवदाम्पत्याला मान देत जावईबापूंचा जाहीर सत्कार केला जातो. होळी पेटवल्यानंतर सर्वप्रथम हे जोडपे प्रदक्षिणा घालते आणि मग गावकरी कुटुंबासह होळीला नारळ आणि ऊस वाहतात. होळीच्या राखेचा टिळा लावल्यानंतर सर्व जण घरचा रस्ता पकडतात. तसेच होळीच्या एक दिवस अगोदर काही गावांत बँड वाजवत आजही सोंग काढण्याची प्रथा आहे; तर काही ठिकाणी होळीच्या दिवशी गावातून नाचत मिरवणूक काढली जाते. यावेळी होळीच्या पूजेचा मान हा गावच्या पाटलाच्या घरातील महिलेला दिला जातो.
-----------------------------------------
पारंपरिक पद्धतींचे जतन
- दिवाळे कोळी वाड्याची होळी ही सर्वात मोठी होळी म्हणून नवी मुंबईत ओळखली जाते. होड्यांची, बोटींची पूजा दिवाळीप्रमाणेच होळी हा दुसरा महत्त्वाचा सण मानला जातो. या सणात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोळीबांधव उपजीविकेचे साधन असलेल्या होड्यांची पूजा करतो. तिची रंगरंगोटी करून तिला नववधूप्रमाणे सजवले जाते.
- कोळीबांधव पारंपरिक वेशभूषेत ढोल-ताशांच्या ठेक्यावर होळीभोवती नाचतात. हा सण नवविवाहित जोडप्यांसाठी महत्त्वाचा असतो, आज जरी आगरी-कोळी समाज शिकला असला तरी होळीची प्रथा मात्र पूर्वी सारखीच पारंपरिक पद्धतीने साजरी करतोय. राहणीमान, पेहराव सगळे बदलले असले तरी होळीच्या सणाची प्रथा मात्र पारंपरिक पद्धतीने जतन करून ठेवली आहे.
----------------------------------------
समाजमाध्यमांवर उत्साह शिगेला
कोरोनाचे सावट कमी झाल्याने नवी मुंबई होळी सणासाठी सज्ज झाली आहे. दोन वर्षे कोरोनामुळे पारंपरिक होळी उत्सव अगदी साधेपणाने साजरा करावा लागला. मात्र, यंदा कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने आगरी-कोळी समाज आतापासूनच पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. आतापासूनच ‘एक गाव एक होळी’ अशी आरोळी दिली जात आहे. तसेच सोशल मीडियावरदेखील गावातील पारंपरिक होळीचे आधीचे व्हिडीओ अपलोड करून आवाहन केले जात आहे.