खानावळीची चव लय भारी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खानावळीची चव लय भारी!
खानावळीची चव लय भारी!

खानावळीची चव लय भारी!

sakal_logo
By

कोमल गायकर, घणसोली
दिवसेंदिवस महागाई वाढत चालली असून या महागाईला सामोरे जाण्यासाठी कुटुंबातील एका व्यक्तीच्या पगारावर अवलंबून राहणे अवघडच आहे. असे असताना घरातील स्त्री आणि पुरुष हे दोघेही नोकरी करत असतील, तर आर्थिक नियोजन योग्य होते. अनेक बॅचलर मुल-मुली तर कुटुंबापासून दूर शहरात राहतात. अशा वेळी विद्यार्थी आणि जोडप्यांसाठी उपयुक्त आईचे किचन म्हणजेच ''खानावळ''. या खानावळीमुळे या वर्गाचा जेवण करण्याचा अमूल्य वेळ वाचतो. महिलांनाही खानावळ हा हॉटेलपेक्षा उत्तम पर्याय वाटतो. शहरात दिवसेंदिवस खानावळी किंवा पोळी भाजी केंद्र हे वरदान ठरत आहे.

धकाधकीच्या जीवनात महिला वर्गाला जेवण बनवणे जमेलच असे नाही. रात्री थकून कामावरून घरी आल्यावर जेवण बनवायचे म्हटले की शरीर थकून जाते. अशा वेळीकोणीतरी आयते ताट समोर आणून दिले, तर शरीराचा थकवा दूर होईल इतका आनंद होतो. घरापासून दूर राहणाऱ्या व्यक्तींसाठी खानावळ हा तर उत्तम पर्याय आहे. खानावळीमध्ये तुम्हाला दोन किंवा तीन प्रकारच्या भाज्या, चपाती, भाकरी, पापड, सोलकढी, लोणचं, अंडा थाळी, फिश थाळी, चिकन, मटण आणि अनेक पदार्थ मिळतात. शहरात वाढत्या नागरिकीकरणामुळे ठिकठिकाणी खानावळीमध्ये वाढ होत आहे. अगदी इटली, पोहे, उपमा ज्याप्रमाणे सायकल, स्टॉलवर उपलब्ध होतात, त्याप्रमाणेच चपाती आणि भाजीही आता महिला विकताना दिसतात. अनेक जण कामावरही खानावळीतला डबा खातात. खानावळीमध्ये कमी किमतीत चांगल्या दर्जाचे जेवण असते. एक वेळची मासिक खानावळ अनेक ठिकाणी साधारण २ हजार रुपये, तर दोन वेळची ३५०० रुपयांपर्यंत सहज उपलब्ध आहे.

नोकरी करणे ही काळाची गरज आहे. महिलांना थकलेल्या अवस्थेत घरी जाऊन जेवण बनवणे त्रासदायक ठरते. खानावळीमुळे घरच्या जेवणाची चव चाखायला मिळते, वेळ आणि पैशांचीही बचत होते.
- रेश्मा आरोटे, नोकरदार महिला

नोकरीसाठी घरापासून दूर असल्याने आईच्या हातचे जेवण केवळ सुट्यांमुळे खायला मिळते. रोज हॉटेलमध्ये जेवण परवडण्याजोगे नसल्याने खानावळीत जेवण केल्यावर घरी जेवल्याचा आनंद मिळतो.
- राहुल परदेशी, नोकरदार तरुण

दिवसेंदिवस खानावळीत येणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आम्हालाही फायदा होत आहे. खानावळीतले जेवण ग्राहकांना पसंतीत उतरत आहे.
- मालती देशमुख, श्री अन्नपूर्णा खानावळ

जेवणाचे दर (रुपयांत)
व्हेज थाळी : ७०-८०
चपाती : ७
भाकरी : १०
भाजी (कोणतीही एक) : ३०-३५
भात-डाळ : ३०
पापड : ५
नॉनव्हेज थाळी : ११० - १२०
सोलकढी : २०-३०