महिलांना कायमस्वरुपी रोजगारासाठी प्रकल्प उभारणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांना कायमस्वरुपी रोजगारासाठी प्रकल्प उभारणार
महिलांना कायमस्वरुपी रोजगारासाठी प्रकल्प उभारणार

महिलांना कायमस्वरुपी रोजगारासाठी प्रकल्प उभारणार

sakal_logo
By

भिवंडी, ता. ५ (बातमीदार ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी महिलांचे सक्षमीकरण गरजेचे आहे. त्या दृष्टिकोनातून भिवंडी तालुक्यातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून कायमस्वरूपी रोजगार मिळवून देण्यासाठी उत्तम प्रकल्प उभारण्याचा विचार केला जात आहे, अशी माहिती केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली. हिरकणीचा वारसदार असलेल्या महिलांनी आत्मविश्वासाने उद्योग व्यवसायात उतरून प्रगती करावी, असे आवाहनही पाटील यांनी या वेळी केले.
भाजप व कपिल पाटील फाऊंडेशनच्या वतीने ‘कपिलोत्सव २०२३’ हा सामाजिक महोत्सव साजरा केला जात आहे. त्यानुसार भिवंडी तालुक्यातील दाभाड येथे आयोजित केलेल्या महिला मेळाव्याला उपस्थित राहून महिला भगिनींना त्‍यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष देवेश पाटील, सिद्धेश पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष पी. के. म्हात्रे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा शीतल तोंडलीकर, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती श्रेया गायकर आदींची उपस्थिती होती. या मेळाव्याला पाच हजारांहून अधिक महिला उपस्थित होत्‍या.
मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली शहरात दूध व भाजीपाल्याला मोठी बाजारपेठ आहे. महाराष्ट्रातील २२ टक्के लोकसंख्या याच पट्ट्यात राहत आहे. त्या दृष्‍टिकोनातून भाजीपाला व डेअरी व्यवसाय करण्यासाठी प्रयत्न करावा. आगामी काळात भिवंडीतील महिला भगिनींना सक्षम करण्यासाठी कायमस्वरूपी रोजगार उभारण्याचा प्रयत्न आहे. महिलांनी मेहनत केल्यास त्यांना सहजपणे रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. या वेळी महंत स्वामी चिंतानंद सरस्वती यांना ठाणे जिल्हा महंत भूषण, भगवान बाबुराव भोईर यांना ठाणे जिल्हा भजन भूषण पुरस्कार, सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व सुदाम हजारे, न्यायाधीशपदावर उत्तीर्ण रुणाली रंजना दयानंद पवार यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी आयोजित केलेल्या लकी ड्रॉमध्ये एका आदिवासी भगिनीला स्कूटीचे बक्षीस मिळाले.
-------------------------------------------------
महिला सक्षमीकरणावर भर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षम झाल्या पाहिजेत, असा संदेश दिला आहे. त्यानुसार भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने तालुक्यातील एका तरी महिलेला कायमस्वरूपी रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा. तालुक्यातील कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी गटागटाने बैठका घ्याव्यात. महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी प्रेरणा द्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले. केंद्र सरकारतर्फे महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. त्याचा फायदाही महिलांनी घ्यावा, असेही ते या वेळी म्‍हणाले.