जंजीरे धारावी किल्ला विजयाला २८४ वर्षे पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जंजीरे धारावी किल्ला विजयाला २८४ वर्षे पूर्ण
जंजीरे धारावी किल्ला विजयाला २८४ वर्षे पूर्ण

जंजीरे धारावी किल्ला विजयाला २८४ वर्षे पूर्ण

sakal_logo
By

प्रकाश लिमये, भाईंदर
भाईंदरजवळील चौक गावात असलेला जंजिरे धारावी किल्ला नरवीर चिमाजी आप्पा यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातून जिंकून घेतल्याच्या ऐतिहासिक घटनेला सोमवारी (६ मार्चला) २८४ वर्षे पूर्ण होत आहेत. जंजिरे धारावी किल्ल्याच्या विजयातच चिमाजी आप्पा यांनी वसई किल्ल्याच्या देदीप्यमान विजयाची मुहूर्तमेढ रोवली होती. जंजिरे धारावी किल्ल्याचा हा विजयदिन मिरा-भाईंदर महापालिकेकडून मोठ्या थाटात साजरा केला जाणार आहे.
वसई येथील किल्ल्याच्या विजयात जंजिरे धारावी किल्ल्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वसई खाडीत जंजिरे धारावी किल्ला व वसईचा किल्ला अगदी समोरासमोर आहेत. वसई किल्ल्याची पाठराखण करणारा किल्ला म्हणून जंजिरे धारावी किल्ल्याची ओळख आहे. इ.स. १७३७ मध्ये मराठे व पोर्तुगीज यांच्यात वसईचा रणसंग्राम पेटलेला असताना अत्यंत मोक्याच्या जागी असलेल्या जंजिरे धारावीला अत्यंत महत्त्व आले. मराठे व पोर्तुगीज हे धारावीचे महत्त्व ओळखून होते. म्हणूनच त्यावेळी शंकराजी केशव यांनी चिमाजी आप्पांना लिहिलेल्या पत्रात धारावी येथे दहा तोफा ठेवल्यास वसई हात बांधून येईल, असे सांगून धारावी येथे किल्ला बांधण्याची आवश्यकता असल्याचे कळवले होते. याची माहिती मिळताच पोर्तुगीजांनी किल्ला बांधत असलेल्या मराठ्यांवर हल्ला करून धारावी बेटाचा ताबा घेतला व किल्ला बांधून पूर्ण केला. त्यानंतर मराठ्यांनी हल्ला करून हा किल्ला ताब्यात घेतला. मात्र १७३८ मध्ये पोर्तुगीजांनी पुन्हा किल्ला जिंकला; पण हार न मानता नरवीर चिमाजी आप्पांनी संघर्ष सुरूच ठेवला. वर्षभर चाललेल्या लढाईनंतर ६ मार्च १७३९ मध्ये चिमाजी आप्पांनी हा किल्ला जिंकला. या किल्ल्यावरूनच त्यांनी वसई किल्ल्यासाठी मोर्चेबांधणी केली. वसईचा किल्ला जिंकण्यासाठी पोर्तुगीजांची समुद्रमार्गे येणारी रसद तोडण्यात जंजिरे धारावी किल्ल्याची त्यांना फार मोठी मदत झाली.
....
नरवीर चिमाजी आप्पांचा अश्वारूढ पुतळा
किल्ल्याचा सध्या एकच बुरूज शाबूत आहे. किल्ल्याच्याच परिसरात ऐतिहासिक धारावी मंदिर व इंग्रजांनी बांधलेली पाण्याची टाकी आहे. या किल्ल्याकडे पुरातत्त्व खात्याचे आजपर्यंत दुर्लक्ष झाले होते. अनेक इतिहासप्रेमी व दुर्गमित्र आपल्यापरीने त्याची निगा राखत होते. त्यांच्याच सातत्याच्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी दहा कोटी रुपये मंजूर केले आहेत. मिरा-भाईंदर महापालिकेनेही किल्ल्यासाठी तीन कोटी रुपयांची भरीव आर्थिक तरतूद केली असून किल्ल्याच्या वरच्या भागात नरवीर चिमाजी आप्पांचा अश्वारूढ पुतळा उभारला आहे.
....
असा साजरा होणार विजयदिन
किल्ल्याला ६ व ७ मार्च असे दोन दिवस दिव्यांची रोषणाई केली जाणार आहे. त्याचबरोबर किल्ल्यात फुलांची सजावट केली जाणार असून परिसरात रांगोळ्या काढण्यात येणार आहेत. ६ मार्चला सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. महापालिका शाळेचे विद्यार्थी पोवाडा, लेझीम नृत्य याचे सादरीकरण करणार आहेत, नरवीर चिमाजी आप्पांची यशोगाथा, त्यांचा इतिहासही यावेळी कथन केला जाणार आहे. त्याआधी धारावीदेवी मंदिरात आरती व नरवीर चिमाजी आप्पांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जाणार आहे.
....
पुष्कर पेशवे यांची उपस्थिती
पेशव्यांचे वंशज पुणे येथील पुष्कर पेशवे यावेळी जातीने उपस्थित राहाणार आहेत, अशी माहिती इतिहासप्रेमी रोहित सुवर्णा यांनी दिली. मिरा-भाईंदर शहरातील नागरिकांनी व गडप्रेमींनी ‘विजय दिवस’ साजरा करण्यासाठी ६ मार्चला सायंकाळी ४ वाजता जंजिरे धारावी किल्ल्यावर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयुक्त दिलीप ढोले यांनी केले आहे.