
एमपीएससीच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांना दोन वर्षांची सवलत
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : एमपीएससीबरोबरच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ७५ हजार जागांच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांना दोन वर्षांची सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाबद्दल आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि कोरोनामुळे रखडलेल्या जाहिरातीनंतर राज्य सरकारने ७५ हजार पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरू केली आहे. या जाहिरातींमध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना वयात दोन वर्षांची वाढीव सवलत मिळण्यासाठी आमदार निरंजन डावखरे यांनी सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांची भेट घेतली होती. त्याचबरोबर विधान परिषदेत नियम क्र. ४६ अन्वये मुद्दा मांडला होता. त्या वेळी राज्य सरकारने ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत सरळसेवेने नियुक्ती करण्यासाठी प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी विहित केलेली कमाल वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत २ वर्षांची शिथिलता देण्याचे प्रस्तावित केले होते. त्यानंतर भाजपा-शिवसेना युती सरकारने तातडीने शासन निर्णय जारी केला. त्यानुसार खुल्या प्रवर्गासाठी ४० वर्षे व मागास प्रवर्गासाठी ४५ वर्षे अशी वयोमर्यादा वाढवण्यात आली. कोरोनामुळे तीन वर्षे वाया गेलेल्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.