नैसर्गिक रंगात रंगूया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नैसर्गिक रंगात रंगूया
नैसर्गिक रंगात रंगूया

नैसर्गिक रंगात रंगूया

sakal_logo
By

स्नेहा महाडिक : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : ‘बुरा ना मानो होली है...’ म्हणत रंगांची उधळण करणारी होळी आणि धुळवड सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण बेतही आखत असल्याचे दिसत आहे, पण होळीच्‍या रंगांचा बेरंग होऊ नये यासाठीही विशेष काळजी ठाणेकर घेत असल्याचे समोर आले आहे. रासायनिक रंग नैसर्गिक रंगांपेक्षा स्वस्त असले तरी त्याच्या वापराने केस, डोळे, त्वचेला हानी पोहचतेच; पण अनेक वेळा पोटाचेही गंभीर विकार होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ठाणेकरही याबाबत अधिक जागरूक झाले असून, रासायनिक रंगांपासून होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी नैसर्गिक, पर्यावरणपूरक रंगांना अधिक पसंती देत आहे. त्यासाठी या वर्षी बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक रंग उपलब्ध झाले आहेत.

होळीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोरोनाचे ‘दहन’ झाल्यामुळे या वर्षी इतर सणांप्रमाणे होळी आणि धुळवडही मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. रंगांचा हा सण आणखी रंगतदार करण्यासाठी ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेसह सर्वच दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात रंग विक्रीसाठी आले आहेत. यामध्ये नवीन ट्रेंड नसला तरी रासायनिक रंगांना मागणी कमी असून, नैसर्गिक रंग विकत घेणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे दरवर्षी मोठ्या प्रमाणात विक्री होणाऱ्या रासायनिक रंगांची जागा आता पर्यावरणपूरक, नैसर्गिक रंगांनी घेतल्याचे दिसत आहे. विशेषत: पालक आपल्या मुलांसाठी नैसर्गिक रंग निवडत असल्याचे मुख्य बाजारपेठेतील दुकानदार गणपत पुरोहित आणि जांभळी नाक्यावरील दुकानदार मुकेश पटेल यांनी दिली.
-------------------------------
ग्रीन शॉपीची सुविधा
गेल्या दहा वर्षांपासून पर्यावरण दक्षता मंडळ नैसर्गिक रंगांबाबत जनजागृती करत आहे. यंदा नैसर्गिक वस्तूंपासून बनविलेले रंग हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने पर्यावरण दक्षता मंडळानेही ग्रीन शॉपी उपलब्ध करून दिली आहे. सध्या बाजारात ५५० रुपये प्रतिकिलो या दराने रंगांची विक्री होते. सुट्ट्या रंगांमध्ये ५० ग्रॅमचे कलर पॅकेट ३० रुपयांमध्ये, तर लाल, हिरवा, भगवा, पिवळा, गुलाबी, जांभळ्या रंगाच्‍या ५० ग्रॅमच्या पॅकेटचा सेट हा १८० रुपयांना विकला जात असल्याची माहिती पर्यावरण दक्षता मंडळाच्या भारती रोकडे यांनी दिली.
------------------------------------------
रासायनिक रंगांचे दुष्परिणाम
रसायनयुक्त रंग हे १०, १५ आणि २० रुपये पाकीट असे उपलब्ध आहेत. सोनेरी, चंदेरी, लाल रंग विक्रीसाठी आले आहेत; पण नैसर्गिक रंगांच्या तुलनेत स्वस्त असलेले हे रासायनिक रंग आरोग्यासाठी हानिकारक असतात, असे मत त्वचारोग तज्ज्ञ आणि पर्यावरण दक्षता मंडळाने व्यक्त केले आहे.
-------------------------------
- रासायनिक रंगांमुळे केस आणि त्वचेला हानी पोहचू शकते. त्वचेला पुरळ येणे, अ‍ॅलर्जी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
- सोनेरी, चंदेरी रासायनिक रंग बनवण्यासाठी मेटॅलिक पेस्टचा वापर होतो. त्यामुळे डोळ्यांना अ‍ॅलर्जी होते. काहींना त्यामुळे कायमचे अंधत्व येण्याचीही भीती असते.
- त्वचेचा कर्करोग होण्याचीही भीती असते. याशिवाय रंग पोटात गेल्यास मूत्रपिंड निकामीही होऊ शकते.
- रासायनिक रंगांमध्ये क्रोमिअम असल्याने फुप्फुसे ती सहज शोषून घेतात. त्यामुळे अस्थमाचा त्रास उद्भवू शकतो. हाडांनाही त्याचा त्रास होतो.
--------------------------------------------------
रंग काढण्यासाठी पेट्रोल, रॉकेलचा वापर टाळा
धुळवड संपली की साधारण दोन-तीन दिवसांनी त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. त्वचेवर चट्टे उमटलेले, केस गळती सुरू झालेले अनेक रुग्ण येतात. हे सर्व रासायनिक रंगांचा वापर केल्यामुळे घडते. म्हणूनच पर्यावरणपूरक रंगांचा वापर करण्याचा सल्ला देतो; पण अनेक वेळा चुकीच्या पद्धतीने रंग काढल्यामुळेही नुकसान पोहचते. रासायनिक रंग सहज त्वचेवरून जात नाहीत. मग काही लोक रासायनिक रंग निघत नाही म्हणून पेट्रोल, रॉकेलचा वापर करतात. पण त्यामुळे त्वचारोगाला आमंत्रण मिळते. याकरिता रंगपंचमी खेळायला जाताना केसांना तेल आणि संपूर्ण अंगाला मॉईश्‍‍चर क्रीम लावून जावे. जेणेकरून रंग त्वचेवर चिटकत नाहीत.
- डॉ. विनय गोपालाणी (त्वचातज्‍ज्ञ, ठाणे स्‍कीन सेंटर)
------------------------------------------
नैसर्गिक रंग सुरक्षित
- पाण्याने सहज धुतले जातात, त्वचेला चिकटून राहत नाहीत.
- पाण्याचा वापर कमी होतो, प्रदर्शन टाळता येते.
- नैसर्गिक रंगांच्या वापरामध्ये किंमतही माफक आणि सुरक्षाही अधिक असते.
- नैसर्गिक रंगांची निर्मिती करताना तांदूळ, मक्याचे पीठ यांचा वापर करण्यात येतो.
- लाल रंगासाठी बीट, हिरव्या रंगासाठी पालक आणि मेहंदीचा उपयोग केला जातो.
- भगव्या रंगात शेंदुराच्या बिया, पिवळा रंग-रानभेंडी फुले, झेंडू फुलांचा वापर, फुले वाळवून त्याची भुकटी बनवून गाळून घेण्यात येते.
- गुलाबी रंगासाठी अष्टर फुलांचा वापर, जांभळा रंग-अष्टर फुले, जांभूळ अर्काचा वापर करण्यात येतो.
--------------------------------------------
जागृतीचा रंग
आम्ही रंगपंचमी खेळतो. मात्र त्यात रंगीबेरंगी नैसर्गिक रंग हे गुलालाप्रमाणे असतात. त्यांचाच वापर करण्‍यात येतो. विविध धोक्यांमुळे रसायनयुक्त रंग वापरणे टाळतो. मुलांनाही पिचकाऱ्यांमध्ये नैसर्गिक रंगच देतो.
- स्वप्नाली कदम (कळवा निवासी)
ृ--------------------------
रंगपंचमीचा यंदा जल्लोष आहे. पिचकाऱ्या आणि होळीसाठी आम्ही सुरक्षित गुलाल, लाल पिवळा, हिरवा खरेदी करतो. आम्हीही ते वापरतो आणि लहान मुलांनाही पिचकाऱ्यांमध्ये भरण्यासाठी देतो. अन्य पदपथावरील रंगही घेणे टाळतो.
- ज्योती ढवळे (लोकमान्य नगर निवासी, ठाणे)