
शासकीय विहिरींची दुरुस्ती करण्याची मागणी
मुरबाड, ता. ४ (बातमीदार) : मुरबाड शहराला भेडसावणारी पाणीसमस्या सोडवण्यासाठी मुरबाड नगरपंचायत हद्दीतील सर्व शासकीय विहिरींची व हॅन्ड पंप यांची दुरुस्ती करावी. तसेच नागरिकांना पिण्यायोग्य पाणी पुरवण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी मुरबाड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दीपक वाघचौडे यांनी मुरबाड नगर पंचायतीचे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना निवेदनाद्वारे केली आहे.
मुरबाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिरवली धरणाच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी धरणातील पाणीसाठा कमी करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ मुरबाड शहरातील नागरिकांना कमी दाबाने व दोन दिवसातून एकदा पाणी पुरविले जाणार आहे. त्यामुळे सर्व शासकीय विहिरींची व हॅन्ड पंप यांची दुरुस्ती करावी. तसेच नागरिकांना पिण्यायोग्य पाणी पुरवण्यासाठी उपायोजना करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी मुरबाड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दीपक वाघचौडे, कार्याध्यक्ष तेजस व्यापारी, सामाजिक न्याय शहर अध्यक्ष विलास जाधव, उपाध्यक्ष अभिषेक डुंकवाल, उपाध्यक्ष संजय चंदने आदी पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी मनोज म्हसे, नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे यांची भेट घेतली.