होळी रे होळी पुरणाची पोळी... होळीच्या सणाला यंदा महागाईची झळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

होळी रे होळी पुरणाची पोळी... होळीच्या सणाला यंदा महागाईची झळ
होळी रे होळी पुरणाची पोळी... होळीच्या सणाला यंदा महागाईची झळ

होळी रे होळी पुरणाची पोळी... होळीच्या सणाला यंदा महागाईची झळ

sakal_logo
By

पुरणपोळ्या महागल्या
तरी सणाचा गोडवा कायम!

मुंबई
होळी सणात पुरणपोळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दादर, परळ आणि लालबाग परिसरातील घरगुती व विविध खाद्यपदार्थांच्या दुकानांत महिला बचत गटांच्या माध्यमातून ‘पुरणपोळ्या मिळतील’ असे फलक झळकू लागले आहेत. होळी सणाला यंदा महागाईची झळ बसली असून १८ ते २० रुपयांना मिळणारी एक पुरणपोळी यंदा २५ ते ३० रुपयांना उपलब्ध होत आहे.

होळी सणात जेवणामध्ये तुपाच्या धारेसोबत पुरणपोळीचा बेत ठरलेलाच असतो. पोळीसोबत कटाची आमटी किंवा गुळवणी असेल तर उत्तमच; मात्र पुरणपोळीचे दर यंदा काही दुकानांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढले आहेत. तरीही उत्साह कमी झालेला नाही. सध्याच्या काळात घरासह नोकरी अशी तारेवरची कसरत करणाऱ्या महिला रेडिमेड पुरणपोळ्यांनाच अधिक पसंती देत आहेत. यंदा मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेने पुरणपोळी पाच ते दहा रुपयांनी महागली आहे. तरीही त्यांची मागणी वाढली आहे. गेल्या वर्षी १८ ते २० रुपयांना पुरणपोळी मिळत होती. यंदा ती २५ ते ३० रुपयांना उपलब्ध आहे. विशेष म्हणजे आकार व वजनावर त्यांचे दर अवलंबून असतात. छोट्या आकाराच्या पुरणपोळ्या २५ रुपयांना मिळत आहेत. मोठ्या आकाराच्या पोळ्या २८ ते ३० रुपयांना विकल्या जात आहेत. दरम्यान, महागाई असूनही काही छोट्या विक्रेत्यांनी मात्र पुरणपोळ्यांचे दर वाढवलेले नाहीत.
सध्या मिठाईच्या दुकानातून पुरणपोळ्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असते. त्या पार्श्वभूमीवर लालबागमध्ये घरगुती पुरणपोळी बनवणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. महागाईत वाढ झाली असली तरी यंदा पुरणपोळ्यांची चांगली विक्री होईल, असा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला.

कटाच्या आमटीलाही मागणी
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत विशेष वेळ काढून पुरणपोळी बनवणे नोकरदार महिलांना कठीण होते. त्यामुळे रेडिमेड पुरणपोळी खरेदी करण्यावर त्यांचा भर असतो. एक आठवडा आधीपासूनच पुरणपोळीची ऑर्डर बुक केली जाते. मागणीनुसार पुरणपोळ्या तयार करून दिल्या जातात. पुरणपोळीसोबत कटाच्या आमटीला पसंती दिली जाते. साहजिकच कटाच्या आमटीला मोठी मागणी आहे. प्रतिप्लेट ७० रुपयांत ती मिळत आहे. विविध वस्तूंची भाववाढ, इंधन दरवाढ आणि वाढलेल्या मजुरीमुळे पुरणपोळी महाग झाली असली, तरी विक्रीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे दादरच्या स्वामी समर्थ गृहउद्योगाच्या अश्विनी श्रीयान यांनी सांगितले.

पुरणपोळी बनवण्यासाठी लागणारे महत्त्वाचे साहित्य म्हणजे गूळ ७० ते १०० रुपये किलोवर गेला आहे. चण्याची डाळ ८५ ते १०० रुपये किलो आहे. मैदा आणि गॅस दरवाढीमुळे प्रत्येक वस्तू दुपटीने महागल्याने पदार्थांच्या किमती वाढल्या आहेत.
- दीपाली करंजे, गृहिणी, ताडदेव