नवीन ठाणे स्थानक येणार ‘रुळावर’

नवीन ठाणे स्थानक येणार ‘रुळावर’

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : रेल्वे स्थानकावरील ‘कोंडी’ फोडण्यासाठी प्रस्तावित असलेल्या नवीन ठाणे स्थानकाचा मोठा अडथळा आता दूर झाला आहे. या स्थानकासाठी आवश्यक असलेली ठाणे मनोरुग्णालयाची जागा हस्तांतरित करू नये, हा स्थगिती आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मागे घेतला आहे. गेली १५ वर्षे प्रतीक्षेत असलेल्या नवीन ठाणे रेल्वे स्थानकासाठी मनोरुग्णालयाची १४ एकर जागा मिळणार आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये खऱ्या अर्थाने नवीन ठाणे रेल्वे स्थानक ‘रुळावर’ येणार असून ठाणे, मुलुंडमधील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ठाणे स्थानकावरील भार कमी करण्यासाठी मुलुंड आणि ठाणे स्थानकांदरम्यान नवे ठाणे स्थानक उभारण्याची मागणी साधारण १५ वर्षांपूर्वी करण्यात आली होती. शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी अनेक वर्षे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने स्थानकाचा आराखडा मंजूर केला. ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत या कामासाठी २८९ कोटींच्या खर्चालाही मंजुरी मिळाली; मात्र या नवीन स्थानकासमोर रोज नवीन आव्हाने निर्माण होऊ लागली. सर्वप्रथम मनोरुग्णालयाची जागा या प्रकल्पासाठी आवश्यक असल्याने राज्याच्या आरोग्य विभागाची मंजुरी आवश्यक होती. तत्कालीन आरोग्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी तातडीने त्याला मंजुरीही दिली; पण नंतर एका जनहित याचिकेच्या कचाट्यात नवीन ठाणे स्थानक सापडले.

मनोरुग्णालयाची जागा कुणालाही हस्तांतरित करून ‘थर्ड पार्टी इंटरेस्ट’ निर्माण करू नका, असे सुनावणीवेळी आदेश १२ ऑगस्ट २०१५ रोजी उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यामुळे जागा हस्तांतरित होत नव्हती. हा न्यायालयीन तिढा दूर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकार आणि ठाणे महापालिकेला दिल्यानंतर चक्र अधिक वेगाने धावू लागले.

सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात नुकतेच एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. त्यात व्यापक जनहितासाठी नवे ठाणे स्थानक उभारण्याची गरज असल्याचे अधोरेखित करण्यात आले. ही विनंती न्यायमूर्ती गंगापूरवाला आणि संदीप मारणे यांनी शुक्रवारी (ता. ३) मान्य करत स्थगिती आदेश उठवला; मात्र जागा हस्तांतरित करण्यापूर्वी मनोरुग्णालयाचे महिला वॉर्ड बाधित होणार आहेत, त्यांची दर्जेदार पर्यायी व्यवस्था करावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले.

३१ टक्क्यांपर्यंत प्रवासीभार हलका होणार
न्यायालयाचा हिरवा कंदील मिळाल्यामुळे नवीन विस्तारित ठाणे स्थानकाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारने आधीच यासाठी २८९ कोटी रुपये मंजूर केले आहेत. हे स्थानक कसे असेल, तेथे कोणत्या पार्किंगसह सोयी-सुविधा असतील, याचे मॉडेलही तयार आहे. नवे ठाणे स्थानक उभारल्याने ठाणे स्थानकावरील सुमारे ३१ टक्के आणि मुलुंड स्थानकावरील प्रवाशांचा २१ टक्के भार कमी होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com