
एसटी डेपो स्वच्छतेचा बागुलबुवा एसटी डेपो स्वच्छतेचा बागुलबुवा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : एसटी महामंडळाच्या डेपोचा कायापालट करण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी राज्याचे परिवहन प्रधान सचिवांच्या पुढाकारे राज्यभरातील विभाग नियंत्रक आणि इतर अधिकारांचा मिळून एक व्हाट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला आहे. ज्यामध्ये दैनंदिन डेपोच्या स्वच्छतेचे फोटो टाकत एसटीच्या मुख्यालयाला माहिती दिली जाते; मात्र शनिवारी सातारा विभागातील नव्याने उभारणी केलेल्या कराड आगाराच्या अस्वच्छतेचे फोटो या व्हाट्सॲप ग्रुपवर व्हायरल करण्यात आले असून, एसटी डेपोच्या स्वच्छतेचा नुसता बागुलबुवा असल्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
एसटी प्रशासनाने गेल्या वर्षीपासून एसटी डेपो आणि त्यांच्या परिसरातील स्वच्छतेवर भर दिला आहे. अधिकाऱ्यांनी दैनंदिन त्यांच्या डेपोतील स्वच्छतेची पाहणी करून त्यासंबंधीत तातडीने मुख्यालयाला त्याची माहिती पुरवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे डेपोच्या स्वच्छतेची माहितीसुद्धा नियमित पुरवली जात आहे. व्हाट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून परिवहन प्रधान सचिव आणि एसटीच्या व्यवस्थापकीय संचालकांना आगाराच्या स्वच्छतेचे नियमित फोटो टाकले जातात; मात्र प्रत्येक दिवशीचे तेच फोटो या व्हाट्सॲप ग्रुपवर टाकल्याच्या घटनासुद्धा यादरम्यान उघड झाल्या. त्यामुळे या फोटो आणि स्वच्छतेच्या सत्यतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच सातारा विभागात नव्याने उभारलेल्या डेपोच्या अस्वच्छतेचे फोटो समोर आले आहेत. यामध्ये डेपो प्रशासनाकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असून, अधिकाऱ्यांची वाहवा मिळवण्यासाठी फक्त एकाच भागातील फोटो काढून अधिकाऱ्यांना ऑन रेकॉर्ड स्वच्छता दाखवल्या जात असल्याचे एसटीच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
---------
कराड आगाराची इमारत नवीन बांधली आहे. इमारतीची अत्यंत सुंदर प्रतिकृती आहे. त्या इमारतीतील विश्रांतिगृहात अस्वच्छता असेल तर दुर्दैव आहे. चालक-वाहक यांच्या आरोग्यविषयक सुविधांकडे एसटीने दुर्लक्ष करणे हे योग्य नाही.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस