मुंबईत शंभर टक्के कचरा वर्गीकरण मोहीम सुरु

मुंबईत शंभर टक्के कचरा वर्गीकरण मोहीम सुरु

मुंबईत शंभर टक्के कचरा वर्गीकरण
डी विभागातर्फे प्रायोगिक तत्त्वावर तीन ठिकाणी प्रयोग

किरण कारंडे, मुंबई
मुंबई महापालिकेच्या डी विभाग कार्यालयाने आपल्या कार्यक्षेत्रातील महत्त्वाच्या तीन ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर शंभर टक्के कचरा वर्गीकरण मोहीम राबविण्यास आठ दिवसांपासून सुरुवात केली आहे. त्याबाबतच्या प्रयोगांमधून मिळणाऱ्या निकषांच्या आधारे योग्य ते बदल आणि सुधारणा करून मुंबई शहर व उपनगरांमधील संपूर्ण विभागामध्ये मोहीम सुरू करण्याचे उद्दिष्ट पालिका प्रशासनाने ठेवले आहे.

मुंबईत कचऱ्याचा मोठा प्रश्न आहे. त्यातही कचरा वर्गीकरणाची मोठी समस्या भेडसावत आहे. त्यासाठी महापालिकेने पाऊल उचलले असून मुंबईत शंभर टक्के कचरा वर्गीकरण मोहीम प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे. पालिकेच्या डी विभागाअंतर्गत वाळकेश्वर, स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी), ताडदेव, हाजी अली, मुंबई सेंट्रल इत्यादी परिसरात नागरी प्रशासनाचे कामकाज सांभाळले जाते. वैविध्यपूर्ण वसाहतींचा समावेश असलेल्या डी विभागाच्या अखत्यारीतील क्षेत्रामध्ये दररोज कमीत कमी कचरा निर्माण व्हावा म्हणून उपआयुक्त (परिमंडळ १) डॉ. संगीता हसनाळे आणि सहायक आयुक्त (डी विभाग) शरद उघडे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शंभर टक्के कचरा वर्गीकरण मोहीम राबवण्यात येत असून प्रयोगाच्या दृष्टीने विविध प्रकारच्या उपाययोजना विभाग स्तरावर करण्यात येत आहेत.

वाळकेश्वर (मलबार हिल) परिसरातील नेपियन्सी मार्ग, भुलाभाई देसाई मार्ग आणि मुंबई सेंट्रलस्थित बी.आय.टी. वसाहत अशा तीन ठिकाणच्या गृहनिर्माण संस्थांमध्ये १०० टक्के कचरा वर्गीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. तीन परिसरात मिळून अंदाजे २०० सोसायट्या आहेत. त्यामधून दररोज अंदाजे १० टन कचरा क्षेपणभूमीला वाहून नेला जातो. सर्व कचऱ्याचे ओला आणि सुका अशा रीतीने सोसायटीतच वर्गीकरण करून संकलित करण्याचे प्रयत्न आठ दिवसांपासून सुरू करण्यात आले आहेत. त्या प्रयत्नांना यश मिळाल्याचा दावा पालिकेने केला आहे.

अशी आहे योजना
- तीनही ठिकाणी असलेल्या सर्व इमारतींना ओला, सुका आणि घरगुती घातक कचरा यांचे वर्गीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- सर्व सोसायटींना कचरा वर्गीकरण करणे सक्तीचे केले गेले आहे. वर्गीकरण करण्यात आलेल्या ओल्या आणि सुक्या कचऱ्यासाठी वाहनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
- योजनेमध्ये अधिकाधिक लोकसहभाग मिळावा यासाठी परिसरामध्ये पथनाट्य, रॅली आणि चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.
- कचरा वर्गीकरण न करणाऱ्या इमारती आणि सोसायट्यांवर महापालिकेच्या प्रचलित नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती सहायक आयुक्त शरद उघडे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com