
विविध भाषिक ज्येष्ठांनी केला मराठीचा जागर
वसई, ता. ५ (बातमीदार) : केवळ मराठी माणसालाच मराठी येत नाही, तर आम्ही बोलतो, वाचतो मराठी असा अभिमान बाळगत असलेल्या विविध भाषिक वर्गातील ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत मराठीचा जागर केला. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी सायंकाळी कार्यक्रमाचे वसईत आयोजन करण्यात आले होते. या वेळी विविध प्रांतातील नागरिक सहभागी झाले होते.
वसई पश्चिम येथे ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संस्थेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन केले होते. या वेळी मीना अडसूळ, सुजाता टिपणीस, राजेश मेहता, श्रीधर मातवणकर, गिरीश कसमणकर आदींनी कविता सादर करत रसिकांची मनमुराद दाद मिळवली. याप्रसंगी मान्यवरांचा परिचय नीला शर्मा यांनी केला.
आपण अनेकदा कोणाशीही संवाद साधताना हिंदी, इंग्रजीत बोलतो मराठीचा वापर करत नाहीत. इंग्रजी येत नाही, याची लाज न बाळगता समोरच्या व्यक्तीला मराठी येत नाही हे पाहा, मराठीसाठी आपण आग्रही असलो पाहिजे. पिठले-भाकरीला इंग्रजीत कुठे शब्द आहे. असे अनेक शब्द आहेत जे फक्त मराठीत आहेत. बोलीभाषेत गोडवा आहे, त्याचे संवर्धन झाले पाहिजे. अनेक अभंग हे अन्य भाषेत अनुवादित केले जातात, असे मत कवयित्री संगीता अरबुने यांनी मांडत आईची महती सांगणारी कविता सादर केली.
कार्यक्रमात मोठ्या संख्येने बहुभाषिक ज्येष्ठ नागरिक असताना सर्व जण मराठीतून संवाद साधत असल्याचे दिसून आले. यावेळी आम्हाला मराठी बोलता येते, लिहिता येते, असा सूर यावेळी मराठीचा जागर करत होता; तर कुठे शोधिसी मानवा हे गीत राजेश मेहता यांनी गायले व प्रेक्षकांनी मनमुराद दाद दिली. या वेळी कवयित्री संगीता अरबुने, माजी नगरसेविका मीना अडसूळ, अध्यक्ष शरद जोशी, उपाध्यक्ष कोकिलाबेन जोशी, सचिव नामदेव वेदक, सहसचिव सूर्यकांत जोशी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत जोशी यांनी केले; तर उपस्थितांचे आभार अध्यक्ष शरद जोशी यांनी मानले.
-------------------
वसई : ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संस्थेच्या आयोजित कार्यक्रमात कवयित्री संगीता अरबुने यांनी कविता सादर केली.