धर्माधिकारी प्रतिष्ठानचे संचालक सचिन धर्माधिकारी यांना डॉक्टरेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धर्माधिकारी प्रतिष्ठानचे संचालक सचिन धर्माधिकारी यांना डॉक्टरेट
धर्माधिकारी प्रतिष्ठानचे संचालक सचिन धर्माधिकारी यांना डॉक्टरेट

धर्माधिकारी प्रतिष्ठानचे संचालक सचिन धर्माधिकारी यांना डॉक्टरेट

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई, ता. ४ : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे संचालक सचिन धर्माधिकारी यांना राजस्थान येथील जगदीशप्रसाद झाबरमल टिबरेवाल विद्यापीठातर्फे ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ने गौरविण्यात येणार आहे. वाशी येथील एक्झिबिशन सेंटर येथे रविवारी (ता. ५) सकाळी ११ वाजता आयोजित कार्यक्रमात ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री महाराष्ट्रभूषण आप्पासाहेब तथा दत्तात्रय धर्माधिकारी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहेत. या पदवीदान सोहळ्याला लाखो श्रीसदस्य तसेच जगदीशप्रसाद झाबरमल टिबरेवाल विद्यापीठाचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

रेवदंडा हेच धर्माधिकारी यांचे मूळ गाव; तर त्यांच्या घराण्याचे मूळ आडनाव शेंडे होते. धर्माधिकारी कुटुंबाच्या १०व्या पिढीतील पूर्वज गोविंद चिंतामणी शांडिल्य ऊर्फ शेंडे हे धर्मजागृतीचे काम स्वेच्छेने करीत. त्या काळचे दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांनी त्यांना सन्मानाने ‘धर्माधिकारी’ ही पदवी दिली. तेव्हापासून हे घराणे धर्माधिकारी हे आडनाव लावू लागले. उपजीविकेसाठी धर्माधिकारी कुटुंबीय हे रेवदंडा येथे ज्योतिषी आणि पौराहित्याचे काम करत असत. १ मार्च १९२२ रोजी रेवदंडा येथे विष्णू धर्माधिकारी यांच्या घरी जन्मलेल्या नारायण धर्माधिकारी (नानासाहेब) यांनीही शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्या वडिलांचा व्यवसाय सुरू केला.

परिसरातील गोरगरीब नागरिक दारू, व्यसन, अंधश्रद्धा यांच्या आहारी गेल्याचे नानासाहेबांच्या लक्षात आले. यासाठी त्यांनी संत साहित्याचा आधार घेत निरूपणाच्या कार्याला ८ ऑक्टोबर १९४३ रीतसर सुरुवात केली. संत साहित्यामधील (दासबोध) अमर मूल्ये यशस्वीपणे प्रसारित करण्यासाठी आणि शिकवण्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी श्री बैठक सुरू केल्या. अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन व व्यसनमुक्तीचे अखंड कार्य करीत असतानाच ८ जुलै २००८ रोजी त्यांचे निधन झाले. नानासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांनी लावलेल्या रोपट्याला संजीवनी देण्याची जबाबदारी त्यांचे ज्येष्ठ पुत्र दत्तात्रेय धर्माधिकारी (आप्पासाहेब धर्माधिकारी) यांच्यावर आली.

नव्या पिढीचे समाजप्रबोधन
१) ‘डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान- रेवदंडा’ या संस्थेची स्थापना केल्यानंतर नानासाहेबांनी लावलेल्या इवल्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले. आप्पासाहेबांचे समाजप्रबोधनाच्या कार्यासाठी भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरविले आहे. युरोपियन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट पॅरिस, फ्रांस यांनी आप्पासाहेबांना लिव्हिंग लेजंड आणि मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली आहे.
२) आप्पासाहेबांच्या या समाजप्रबोधन कार्यात संपूर्ण धर्माधिकारी कुटुंबीय सहभागी आहेत. वेगवेगळ्या समाजकार्यात ते नेहमी भाग घेतात. नानासाहेबांनंतर आप्पासाहेब, आप्पासाहेबांनतर उत्तराधिकारी म्हणून आप्पासाहेबांचे पुत्र सचिन धर्माधिकारी यांची निवड झाली आहे. नव्या पिढीचे सचिन धर्माधिकारी हे समाजप्रबोधनाचे काम अधिक वेगाने करीत आहेत. त्यांनी समाजसेवेचे व्रत स्वीकारून आपल्या आजोबांची परंपरा कायम ठेवली आहे.