
लाच घेताना वनरक्षक रंगेहात
पालघर, ता. ४ (बातमीदार) : वन विभागाकडून भूमिहीन आदिवासींना वाटप करण्यात आलेली जमीन नावावर करून देण्यासाठी वसई तालुक्यातील मांडवी येथील वनरक्षकाने ५० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यापैकी २० हजार रुपये घेताना पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पेल्हार येथे त्याला रंगेहात पकडण्यात आले.
रणजित दिनकर डोळे हे वसई तालुक्यात वनपरिक्षेत्र कार्यालय, मांडवी येथे वनरक्षक पदावर कार्यरत आहेत. तक्रारदारास भूमिहीन आदिवासींना वाटप करण्यात आलेल्या जमिनीपैकी सहा गुंठे जमीन त्यांच्या नावावर करून देण्यासाठी प्रतिगुंठा दीड लाख रुपये भावाप्रमाणे नऊ लाख रुपये किंमत होत होती. त्या अनुषंगाने त्या जागेवर बांधकाम करताना कोणत्याही प्रकारची कारवाई होऊ नये, यासाठी डोळे यांनी ५० हजार रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी तक्रारदाराने पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती. वसई तालुक्यातील पेल्हार येथे सापळा रचून डोळे यास २० हजार रुपयांची घेताना रंगेहात पकडण्यात आले. त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे प्रतिबंधक विभागाकडून सांगण्यात आले.