पालघरमध्ये होळीचा चोख बंदोबस्त

पालघरमध्ये होळीचा चोख बंदोबस्त

वसई, ता. ५ (बातमीदार) : रंगपंचमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो; मात्र या वेळी अनेकदा वाद, हाणामाऱ्या, मद्यप्राशन करून वाहन चालवल्याने अपघातासारख्या घटना घडत असतात. त्यामुळे मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालय व पालघर ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तसेच वाहतूक विभाग वाहनांची तपासणी करण्यासह मद्यप्राशन करून वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई करणार आहे.
मिरा-भाईंदर वसई-विरार शहरात सार्वजनिक ठिकाणी २२८; तर खासगी १६५ ठिकाणी होळीचे आयोजन करण्यात आले आहे; तर पालघर ग्रामीण भागातील विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, डहाणू, पालघर या ठिकाणीदेखील उत्साहात रंगपंचमी साजरी केली जाणार आहे. या उत्सावाच्या काळात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस दल सज्ज झाले आहे. होळीचा सण शांततेत पार पडावा, याकरिता नियमावलीचे परिपत्रक काढण्यात आले आहे. आयुक्तालयाच्या हद्दीत येणाऱ्या १६ पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी आदीचा बंदोबत असणार आहे.
पालघर जिल्ह्यात समुद्रकिनारा मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी मद्यप्राशन किंवा सुसाट वाहने चालविताना आढळल्यास वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांची करडी नजर असणार आहे. तपासणी करण्यासाठी चौक, मुख्य मार्गावर पोलिसांचा जागता पहारा असणार आहे. वसईतील मांडवी, पेल्हार, अर्नाळा, नालासोपारा व विरार आदी ठिकाणी एकूण ३५ हुन अधिक वाहतूक पोलिस तैनात असणार आहेत; तर वसई, सनसिटी, अंबाडी, बाभोळा यासह आजूबाजूच्या परिसरातदेखील पोलिसांचे पथक रंगपंचमीला गालबोट लागू नये म्हणून लक्ष देणार आहे.
------------
सणाच्या उत्साहात सुसाट वेगाने वाहन चालविणे, मद्यप्राशन करणे हे दुर्घटनेला कारणीभूत व जीवाला धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अशा वाहनचालकांवर कारवाई केली जाणार आहे. यासाठी विविध चौकांसह शहरातील मुख्य मार्गांवर वाहतूक पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. तसेच संवेदनशील भागात नाकाबंदी करण्यात येणार आहे. तसेच उत्सवाच्या काळात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत.
- प्रशांत लांघी, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग
-------
‘कायद्याचे पालन करा’
रंगपंचमी खेळताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालयाकडून हद्दीत ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. नागरिकांनीदेखील सण साजरा करताना कायद्याचे पालन करावे. जर कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
----
डोळ्यांची काळजी घ्या
होळीमध्ये खासकरून डोळ्यांची रंगांपासून काळजी घेणे फारच आवश्यक असते. कारण डोळे हे आपल्या शरीरातील नाजूक अवयवांपैकी एक आहेत. रंगामध्ये सोडियम बायकार्बोनेट, ट्रायकॅल्शियम फॉस्फेट किंवा सिलिकॉन डायऑक्साइड, कॅल्शियम कार्बोनेट आणि विविध सुगंध असतात. या रसायनांच्या संपर्कात आल्याने ॲलर्जी, संसर्ग, तात्पुरते अंधत्व आणि डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागात दाह होऊ शकतो. त्यामुळे नैसर्गिक रंगाचा वापर करून होळीचा आनंद लुटल्यास इजा होणार नाही, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
-------------------
कुठे होणार गर्दी?
अर्नाळा, कळंब, केळवे, डहाणू, वसई सुरुची बाग, चिंचोटी येथे नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. याचबरोबर होळीनिमित्त जीवदानी मंदिर, चंडिका मंदिर, शीतलादेवी, महालक्ष्मी, तुंगारेश्वर महादेव मंदिर आदी ठिकाणीदेखील भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असून या भागात प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com