
कुर्ला पोलिसांनी केले साडेसात लाखांचे दागिने हस्तगत
घाटकोपर, ता. ५ (बातमीदार) ः कुर्ला पश्चिमेकडील श्रीकृष्ण चौकातील खंडोबा मंदिर येथील बीएमसी कॉलनीतील एका घरात घरफोडी करून जवळपास १३ लाख किमतीचे सोन्याचे दागिने पळवणाऱ्या दोघांना कुर्ला पोलिसांनी जालना येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून सात लाख ३६ हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. राकेश सुग्रीव खरटमोल आणि सोनू रमेश जगदाने अशी आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी मिरा गोविंद बोराडे यांच्या कुर्ला पश्चिम येथील घरी गेल्या फेब्रुवारी महिन्यात रात्री दरोडा पडला होता. याप्रकरणी कुर्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त मनोज पाटील, सहायक पोलिस आयुक्त व वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र होवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक पाटील आणि गुन्हे प्रकटीकरण पथक या गुन्ह्याचा तांत्रिक पद्धतीने तपास करीत होते.
अशी झाली अटक
गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार हा नालासोपारा येथील शौर्य अपार्टमेंटजवळ असल्याबाबत कुर्ला पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकने सापळा रचून शिताफीने एका आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केला असता त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला. या आरोपीच्या तपासादरम्यान त्याचा गुन्ह्यातील साथीदार सोनू जगदाने याच्या राहण्याच्या ठिकाणाबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सोनू जगदाने याला त्याचे मूळ गाव रामनगर रोड, जालना येथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. दरम्यान, या आरोपींकडून चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत करण्यात आलेली आहे. कुर्ला पोलिस ठाण्यातील अधिकारी व गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहायक पोलिस निरीक्षक नंदुलाल पाटील तसेच अंमलदार लांडगे, मानकर, वाघ, साबळे, इंगळे, वावरे, लहामग यांनी ही कारवाई केली, अशी माहिती रवींद्र होवाळे यांनी दिली.