
चाकरमान्यांची एसटीला सर्वाधिक पसंती
अलिबाग, ता. ५ (बातमीदार)ः होळीनिमित्त गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी एसटी महामंडळ रायगड विभागाने ज्यादा बसेसची सुविधा उपलब्ध केली होती. या सुविधेला मुंबई, पुणे, बोरिवली, ठाणे येथील चाकरमान्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून सर्व बसेसचे बुकिंग झाले असल्याची माहिती विभाग कार्यालयाने दिली आहे.
होळी तसेच धूलिवंदनानिमित्त कुटुंबीयांसह गावाकडे जाण्याचा अनेकांचा कल असतो. काहींनी एसटीतून; तर काहींनी खासगी वाहनांमधून गावी जाण्याची तयारी केली आहे. त्यामुळे एसटी महामंडळ रायगड विभागामार्फत १२ मार्चपर्यंत ज्यादा बसेस सोडल्या जाणार आहेत. यावेळी मुंबई, ठाणे, बोरिवली, नालासोपारा येथून येणाऱ्या प्रवाशांसाठी ठाणे-महाड, बोरिवली -महाड, नालासोपारा- महाड, मुंबई - तळा, वाशी - श्रीवर्धन, भांडुप - बोर्ली - श्रीवर्धन, चिंचवड - फौजी आंबवडे या बसेस सोडल्या जाणार आहेत. तर होळी, धुळीवंदनानंतर परतीच्या मार्गावर असणाऱ्या प्रवाशांसाठी पोलादपूर- ठाणे, महाड - बोरिवली, महाड - मुंबई, श्रीवर्धन- नालासोपारा, श्रीवर्धन - मुंबई , श्रीवर्धन - बोरिवली, मुरूड - मुंबई, मुरुड - नालासोपारा, तळा - नालासोपारा, श्रीवर्धन- मुंबई, महाड- बोरिवली, महाड - ठाणे, मुरुड - विठ्ठलवाडी, फौजी आंबवडे - चिंचवड, पाली- बोरिवली एसटी बसलादेखील चाकरमान्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून बुकिंग झाले असल्याची माहिती विभाग नियंत्रक दीपक घोडे यांनी दिली आहे.