प्रदुषणाकारी कपंन्यांवर अंकुश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रदुषणाकारी कपंन्यांवर अंकुश
प्रदुषणाकारी कपंन्यांवर अंकुश

प्रदुषणाकारी कपंन्यांवर अंकुश

sakal_logo
By

खारघर, ता. ५ (बातमीदार) : तळोजा औद्योगिक क्षेत्रातून होणाऱ्या वायुप्रदूषणाचे मोजमाप करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाने अकरा ठिकाणी प्रदूषणाचे मोजमाप करणारे स्वयंचलित यंत्रणा उभी केली आहे. या यंत्रणेमुळे खारघर, तळोजा परिसरात होत असलेल्या प्रदूषणाची माहिती संकलित होणार असल्याने प्रदूषणकारी कंपन्यांवर कडक कारवाई करणे अधिक सोप्पे होणार आहे.
तळोजा एमआयडीसीमध्ये असलेल्या रसायन उद्योगांमुळे मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होत आहे. रात्रीच्या वेळी होणाऱ्या या प्रदूषणामुळे येणाऱ्या उग्र वासामुळे खारघर तसेच तळोजा परिसरातील रहिवासी हैराण आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना होणाऱ्या या त्रासामुळे आदर्श सामाजिक संस्थेने लोक आयुक्तांकडे तळोजा औद्योगिक वसाहतीमधील होणाऱ्या प्रदूषणाची तक्रार केली आहे. या प्रकरणी झालेल्या सुनावणीत लोकायुक्तांनी नवी मुंबई प्रदूषण महामंडळाला प्रदूषण मोजमाप करणारे यंत्र बसवावे, असे आदेश दिले होते. या आदेशांची अंमलबजावणी करताना प्रदूषण नियंत्रण मंडळाने तळोजा वसाहत सेक्टर २१ मधील केदार सोसायटी, सिद्धी करवले, घोट परिसर, तळोजा, नावडे, कळंबोली, खारघर अशा जवळपास अकरा ठिकाणी वायुप्रदूषणाचे मोजमाप करण्यासाठीची स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित केली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी हवेत प्रदूषण करणाऱ्या कंपनीचे धाबे दणाणले आहेत.
------------------------------------------
इत्यंभूत माहिती मिळणार
गेल्या काही दिवसांपासून तळोजा औद्योगिक वसाहतीमधून रात्री आठ आणि पहाटे चारच्या सुमारास वायुप्रदूषण होत असे. मात्र, होणाऱ्या प्रदूषणाची मोजमाप करणारी यंत्रणा नसल्यामुळे तळोजा औद्योगिक वसाहतीमधील यंत्रणांचे फावले होते. अखेर प्रदूषण नियंत्रण मंडळाने आता स्वयंचलित यंत्रणा उभी केली असल्यामुळे पाच दिवस कंपन्यांमधून सोडल्या जाणाऱ्या वायुप्रदूषणाची माहिती सहाव्या दिवशी समजणार आहे.
-----------------------------------------
तळोजा औद्योगिक परिसरातून सोडल्या जाणाऱ्या वायुप्रदूषणाचे मोजमाप करणारे स्वयंचलित यंत्र असलेली एक वाहने अकरा ठिकाणी कार्यान्वित करण्यात आली आहे. पाच दिवस हे वाहन असणार असून हवेतील प्रदूषण या यंत्रात मोजमाप केले जाणार आहे.
- सचिन आडकर, अधिकारी, प्रदूषण महामंडळ, तळोजा विभाग
----------------------------------
तळोजा औद्योगिक वसाहतीतून रात्रीच्या वेळी सोडले जाणारे वायुप्रदूषण मोजमाप करण्यासाठी अकरा ठिकाणी यंत्र उभारण्यात आली आहेत. त्यामुळे प्रदूषण महामंडळाने या यंत्रावर लक्ष केंद्रित करावे.
- अंकुश गायकवाड, सदस्य, आदर्श सामाजिक संस्था, तळोजा