
बांबू हस्तकलेतून महिला सक्षमीकरण
विरार, ता. ७ (बातमीदार) : सर्वच क्षेत्रांत महिलांचा विकास व्हावा यासाठी जगभर महिला दिन साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधून हा दिवस पालघरमधील दुर्वेश गावातील आदिवासी बांबू हस्तकला कारागीर महिला साजरा करत आहेत. सेवा विवेक सामाजिक संस्थेतून बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर या महिला बांबू हस्तकला काम करून रोजगार मिळवत आहेत. प्रत्येक प्रशिक्षित महिला आपल्या सोबतच्या तसेच आजूबाजूच्या गावांतील सर्व महिलांना रोजगार मिळवून देऊन महिला सक्षमीकरण करण्याचा निर्धार करत आहे. सेवा विवेक सामाजिक संस्थेतून बांबू हस्तकला प्रशिक्षण घेतल्यावर महिलांना रोजगार प्राप्ती होऊ लागला आहे.
आदिवासी महिलांनी बांबू हस्तकलेपासून तयार केलेल्या वस्तू जगाच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहेत. ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर दिसणाऱ्या बांबूचे, वेताचे पेन स्टॅण्ड, मोबाईल होल्डर, मेकअप बॉक्स किंवा अनेक लहान-मोठ्या वस्तू या पालघर जिल्ह्यातील अनेक गावांत तयार झालेल्या आहेत. आदिवासी पाड्यांवर तयार होणाऱ्या आणि आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी उपयुक्त ठरणाऱ्या, रोजगारनिर्मितीचे साधन ठरणाऱ्या अनेक वस्तू आता ऑनलाईन अर्थात जगाच्या पाठीवर पोहचल्या आहेत.
------------------
सेवा विवेक सामाजिक संस्थेमधून मी बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण घेतले. आज मी पालघर जिल्ह्यातील शेकडो महिलांना सेवा विवेकच्या माध्यमातून शिकवत आहे. माझे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर मी रोजगार मिळवू लागले. त्यामुळे मी माझ्या आई-वडिलांना घरखर्च चालवण्यात हातभार लावू शकले. माझ्या लग्नाच्या खर्चात आई-वडिलांना मदत केली. लग्न झाल्यावर नवऱ्याच्या मदतीने स्वतःचे आम्ही घर बनवू शकलो. एक महिला म्हणून एवढे सर्व करताना माझा आत्मविश्वास वाढला.
- निर्मला दांडेकर, प्रशिक्षक अधिकारी
-----------------
मी दुर्वेश देसाक पाडा येथे राहते. गेल्या २५ दिवसांपासून मी प्रशिक्षण घेत असून आतापर्यंत मी बांबू हस्तकलेतून अनेक वस्तू बनवायला शिकले आहे. यातून मला स्वतःच्या पायावर उभे राहायचे असून घरालाही आधार द्यायचा आहे. तसेच माझ्यासारख्या इतर महिलांनाही सक्षम करायचे आहे.
- काव्या दळवी, बांबू हस्तकला कारागीर