एनएमएमटीचे विद्युतीकरण वेगात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एनएमएमटीचे विद्युतीकरण वेगात
एनएमएमटीचे विद्युतीकरण वेगात

एनएमएमटीचे विद्युतीकरण वेगात

sakal_logo
By

वाशी, ता. ८ (बातमीदार)ः महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचा डिझेल बसने सुरू झालेला प्रवास आता विद्युतीकरणाकडे अधिक स्थिरावत आहे. कारण परिवहन ताफ्यातील डिझेलच्या जुन्या ६५ बस लवकरच भंगारात काढल्या जाणार असून पर्याय म्हणून राज्य सरकारकडून नवी मुंबई महापालिका शंभर विद्युत बस घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे नवी मुंबई पालिकेच्या परिवहन ताफ्यात लवकरच डिझेलवर चालणारी एकही बस अस्तित्वात राहणार नाही.
देशातील बहुतांश सार्वजनिक परिवहन उपक्रम तोट्यात चालवले जात आहेत. नवी मुंबई महापालिकादेखील त्याला अपवाद नाही. त्यामुळे एनएमएमटीचा तोटा भरून काढण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून डिझेलवरील वाहनांची संख्या कमी केली जात आहेत. याअंतर्गत २७ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या जुन्या बस भंगारात काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यापैकी डिझेलवर चालणाऱ्या तीस बसगाड्या लवकरच भंगारात काढल्या जाणार आहेत; तर २००९ मध्ये सीएनजीत परिवर्तित केलेल्या ३५ बसचादेखील समावेश आहे. त्यामुळे जवळपास ६५ बसगाड्या भंगारात काढल्या जाणार असल्याने एनएमएमटीच्या ताफ्यात नवीन विद्युत बसगाड्या दाखल केल्या जाणार आहेत.
-------------------------------
मोक्याच्या स्थानकांचा विकास
- नवी मुंबई पालिकेच्या परिवहन उपक्रमाला सक्षम करण्यासाठी बस आगार तसेच मोक्याच्या स्थानकांचा विकास केला जाणार आहे. त्यासाठी वाशी सेक्टर नऊमधील मध्यवर्ती बस स्थानकाच्या जागेत तीस मजल्याची टोलेजंग इमारत उभारली जात आहे. दोनशे कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या एनएमएमटी बस टर्मिनल्समधील पहिले पाच मजले हे बस आणि इतर खासगी वाहनांसाठी आरक्षित आहेत.
- या इमारतीतील कार्यालये तसेच तळमजल्यावर असणारी वाणिज्यिक संकुले दीर्घ भाडेपट्ट्यावर दिल्यास एनएमएमटीच्या तिजोरीत भरीव रक्कम जमा होणार असून हा प्रयोग यशस्वी झाल्यास कोपरखैरणे आणि सीबीडी येथील बस स्थानकांचा विकास केला जाणार आहे. या वाणिज्यिक संकुलामधून एनएमएमटीला कोट्यवधींचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे या अतिरिक्त उत्पन्नाची व्यवस्था झाल्यास तोट्यात चालणारा हा उपक्रम किमान ना नफा ना तोटा चालू शकेल, असा विश्वास आहे.
--------------------------------------
तोटा वाढण्याची कारणे
एनएमएमटीचा ६१ टक्के खर्च हा केवळ कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वेतनावर होत आहे. तसेच इंधनावर होणारा खर्च अनियंत्रित असल्याने हा तोटा वाढत चालला आहे.
-------------------------------------
एनएमएमटीच्या अनेक बस जुन्या झाल्या आहेत. यातील ६५ बसगाड्या भंगारात काढल्या जाणार आहेत. त्यात काही सीएनजी बसगाड्यांचाही समावेश आहे. त्यामुळे जुन्या बसना नवीन पर्याय म्हणून शंभर विद्युत बसचा प्रस्ताव आहे.
- योगेश कडूसकर, व्यवस्थापक, एनएमएमटी