एकाच वेळी दहावी-बारावीचा पेपर

एकाच वेळी दहावी-बारावीचा पेपर

खर्डी, ता. ५ (बातमीदार) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सध्या सुरू असलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेच्या एकाच दिवशी व एकाच वेळी दोन्ही वर्गाचे पेपर घेण्यात येणार आहेत. त्यामुळे शहापूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या पाच परीक्षा केंद्रांत वर्ग खोल्यांची संख्या कमी व परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. एका वर्गखोलीत २५ विद्यार्थी परीक्षेला बसण्याचा बोर्डाचा निर्णय असल्याने इतर नजीकच्या शाळेत वर्गखोल्यांत नियोजन करणे जिकीरीचे होणार आहे.

८ मार्च रोजी दहावीचा हिंदी द्वितीय व बारावीचा जीवशास्त्र; तर १७ मार्च रोजी बारावीचा भूगोल व दहावीचा विज्ञान- १ या विषयांची परीक्षा सकाळी ११ ते २ या वेळेदरम्यान एकाच वेळी होणार आहे. शहापूर तालुक्यातील खर्डीत ८८०, डोळखांबमध्ये ४८६, वासिंदमध्ये १३८७, शहापूरमध्ये १९८३ व किनव्हलीत ५६८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षा केंद्रांवर एकाच वेळी दहावी व बारावीचे पाच हजारच्या आसपास विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करताना संबंधित शाळा व्यवस्थापनच्या नाकीनऊ येणार आहे; तर विद्यार्थीही बैठकव्यवस्था कशी व कुठे होणार या विवंचनेत आहेत.

--------------------
तांत्रिक अडचण उद्‍भवणार
बोर्डाने शाळा व्यवस्थापनाकडे बैठक व्यवस्था न झाल्यास एकाच बेंचवर दोन विद्यार्थी बसण्याची परवानगी दिली आहे; परंतु यामुळे पेपर संपल्यावर दहावीच्या विद्यार्थ्यांने बारावीच्या सुपरवायझरकडे पेपर जमा केल्यास पुढील अडचणींना जबाबदार कोण? दोन विद्यार्थी शेजारी आल्यास कॉपी होण्याचे प्रकार होऊ शकतात. सुपरवायझर शिक्षकांना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. यासाठी बोर्डाने परीक्षा केंद्र व्यवस्थापनाला स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यास सक्तीचे करण्याची गरज असल्याचे मत विद्यार्थी व पालक व्यक्त करीत आहेत.

---------------
तालुक्यातील पाच परीक्षा केंद्रांना बोर्डाचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण होऊ नये यासाठी संबंधित परीक्षा केंद्रांना स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- भाऊसाहेब चव्हाण, गटशिक्षणाधिकारी, शहापूर

-----------------------
खर्डी परीक्षा केंद्रावर स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यासाठी ३७ वर्ग खोल्यांची गरज आहे; पण त्या इमारतीत फक्त २१ वर्ग खोल्या असल्याने व उर्वरित विद्यार्थ्यांची नियोजनाअभावी स्वतंत्र सोय होणे अशक्य आहे. एकाच बेंचवर दोन विद्यार्थी बसण्याची परवानगी घेण्यासाठी बोर्डाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
- विलास साळवे, केंद्रप्रमुख

---------------
एकाच दिवशी दोन पेपर आल्याने संबंधित शाळेच्या केंद्रप्रमुखांनी विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी यांना आदेश देण्यात आले आहेत.
- सुभाष बोरसे, विभागीय सचिव, शिक्षण मंडळ मुंबई बोर्ड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com