
कोंढले-खैरे रस्त्याची दुरवस्था
वाडा, ता. ७ (बातमीदार) : तालुक्यातील कोंढले-खैरे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून रस्ता मोठ्या प्रमाणात नादुरुस्त झाला आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालवताना कसरत करावी लागते. वाहनचालक जीव मुठीत घेऊन वाहन चालक प्रवास करीत आहेत. शासनाने तातडीने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत. या रस्त्याची प्रशासनाने गंभीर दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
वाडा तालुक्यातील कोंढले-खैरे हा नऊ किलोमीटर अंतराचा रस्ता मोठ्या वर्दळीचा असून व गावपाड्यांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. या रस्त्याची सध्या चाळण झाली असून गावपाड्यांतील नागरिकांना या खड्डेमय रस्त्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी; अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पासोरीपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील यांनी दिला आहे.
----------------------
पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत कोंढले-खैरे या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचा प्रस्ताव लवकरच तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे रस्तादुरुस्ती लवकरच होईल.
- विनोद घोलप, कनिष्ठ अभियंता