
कचराकुंडीसह परिसराची स्वच्छता
जोगेश्वरी, ता. ५ (बातमीदार) ः जोगेश्वरी पूर्वच्या सर्वोदयनगर मार्गावरील संजयनगर येथील सुन्नी कब्रस्तानजवळील रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. येथील कचराकुंड्याही कचऱ्याने भरल्या होत्या. याबाबत ‘सकाळ’ने (ता. २८) वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत पालिकेने येथील परिसर स्वच्छ केला आहे.
जोगेश्वरीत अनेक ठिकाणी कचाऱ्याचे साम्राज्य पहायला मिळत होते. हेमा इंडस्ट्रीजवळील पोस्ट कार्यालयासमोरील रस्त्यावर कचऱ्याबरोबर कचरा वेचणाऱ्यांच्या गोण्यांमुळे फुटपाथच कचरा वेचणाऱ्यांना आंदण दिला आहे की काय, असा प्रश्न पडत होता; मात्र के पूर्वच्या घनकचरा विभागाने तातडीने येथे कारवाई केली आहे. परिसर स्वच्छ झाल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कचऱ्याच्या गोण्या ठेवत फुटपाथ अडविणाऱ्यांच्या येथील गोण्या कायमच्या हटवल्या आहेत. या भागात कचरा वेचणाऱ्यांवर कारवाई करणार आहोत.
– अरुण पाखरे, घनकचरा विभाग अधिकारी