
विजेच्या खांबाला गळफास घेत एकाची आत्महत्या
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ५ : डोंबिवली पूर्वेतील स्टेशन परिसरातील विजेच्या खांबाला गळफास घेत एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. रेल्वे स्थानक परिसरातील शुभ मंगल कार्यालयासमोरील रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका विजेच्या खांबाला या व्यक्तीने गळफास घेतल्याची बाब काही नागरिकांच्या लक्षात आली. त्यानंतर त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी जमू लाली. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास काही नागरिकांनी याची माहिती रामनगर पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदर व्यक्तीचा मृतदेह खाली उतरवून, विच्छेदनासाठी रुक्मिणीबाई रुग्णालय येथे हलविला आहे. घटनास्थळी पोलिसांना एक बॅग आढळून आली. मात्र, त्यात कोणतीही कागदपत्रे अथवा व्यक्तीची ओळख पटेल, असे काही पुरावे आढळून आले नाहीत. त्यामुळे आत्महत्या करणारी व्यक्ती कोण, कोठून आली, याची अद्याप माहिती मिळालेली नाही. याचा अधिक तपास रामनगर पोलिस करत आहेत.