‘मनशक्ती’ला वाढता प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘मनशक्ती’ला वाढता प्रतिसाद
‘मनशक्ती’ला वाढता प्रतिसाद

‘मनशक्ती’ला वाढता प्रतिसाद

sakal_logo
By

भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : ग्रामीण भागातील जनतेच्या मानसिक आजारांवर योग्य ते उपचार प्राथमिक आरोग्य केंद्रांतच उपलब्ध व्हावेत, यासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागातर्फे ग्रामीण भागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मनशक्ती क्लिनिकची स्थापना केली आहे. गेल्या दोन वर्षांत १,६८० मनशक्ती क्लिनिक सुरू करण्यात आली असून त्यामध्ये आतापर्यंत १ लाख १८ हजार ८१५ नागरिकांनी भेट दिली.
राज्य सरकारने मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित केले आहे. राज्यात १,९०६ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. त्यापैकी १,६८० प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मनशक्ती क्लिनिक सुरू केली आहेत. उर्वरित ठिकाणी येत्या ३१ मार्चपर्यंत क्लिनिक सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. मनशक्ती केंद्रात एकूण सात जणांची टीम कार्यरत आहे. मानसोपचारतज्ज्ञाचा त्यात समावेश आहे, असे आरोग्य सेवा संचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी सांगितले.
...
रुग्णांचे वर्गीकरण
उपचार घेतलेले पुरुष - ३६,११८
उपचार घेतलेल्या महिला - २१,४१६
उपचार घेतलेली मुले - ४,११३
...
मन बळकटीकरणाचा उद्देश
प्राथमिक आरोग्य केंद्रातील जे वैद्यकीय अधिकारी आहेत, जसे की डॉक्टर्स, परिचारिका, स्टाफ कर्मचारी हे मनशक्ती क्लिनिक चालवतात. या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मानसोपचारतज्ज्ञांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते. मानसिक समस्या कोणत्या आणि त्या कशा पद्धतीने हाताळायच्या याबद्दल त्यांना प्रशिक्षण दिलेले असते. मानसोपचार हा विषय एमबीबीएसच्या अभ्यासक्रमात असतो; पण प्रात्यक्षिक स्वरूपात त्याचा वापर कसा करायचा, याचे प्रशिक्षण त्यांना दिले जाते. रोग बरा करणे हा दुय्यम मार्ग आहे; पण मनशक्ती क्लिनिकचा मुख्य उद्देश मनाची शक्ती बळकट करणे हा आहे.
...
उपचारांची पंचसूत्री
संतुलित आहार
शारीरिक व्यायाम
व्यसनापासून दूर राहणे
अंधश्रद्धांना बळी न पडणे
नियमित झोप व तणावमुक्त जीवनशैली
...
किशोरवयीन मुलांचा वाढता भार
१० ते १४ या किशोरवयीन वयोगटातील मुले या मनशक्ती क्लिनिकला वेगवेगळ्या कारणांसाठी सल्ला घेण्यास दाखल होतात. त्यामध्ये मुलाचा अभ्यास न होणे, वेगवेगळ्या व्हिडीओ क्लिप पाहत राहणे, झोप न लागणे, मैदानी खेळात सहभाग न घेणे, एकटेपणा जाणवणे या तक्रारी असतात. त्यांच्यावर समुपदेशन आणि सल्ला दिला जातो.
...
टोल फ्री क्रमांक
टोल फ्री क्रमांक १४४१६ वरून मानसिक सल्ला दिला जातो. ज्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रातही जायचे नसल्यास त्यांच्यासाठी हा पर्याय फार सोयीस्कर आहे, असेही डॉ. लाळे यांनी स्पष्ट केले.