
प्लास्टिकविरोधी पथकावर हल्ला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : ठाण्यात फेरीवाल्यांची मुजोरी विकोपाला गेली असताना आता दुकानदारांकडूनही पालिका कर्मचाऱ्यांवर हल्ले होत असल्याचा प्रकार शनिवारी (ता. ४) घडला. प्लास्टिकविरोधी कारवाई करत असताना दुकानदाराने पथकावर हल्ला केला असून यामध्ये उपमुख्य स्वच्छता निरीक्षक हेमंत चौधरी यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी आरोपी दुकानदार बाळाराम देवासी याच्याविरोधात वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
ठाणे महापालिकेचे उपमुख्य स्वच्छता निरीक्षक हेमंत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली दीपेश मंत्री आणि समीर डोळे हे स्वच्छता निरीक्षक आणि उस्मान खान हा सफाई कामगार यांचे पथक समता नगर भागातील रस्त्यावर पडलेला कचरा, कचरा फेकणारे नागरिक आणि बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांची तपासणी करत होते. या वेळी भैरी भवानी सुपर मार्केट या दुकानात प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक चमचे आणि इतर बंदी असलेले प्लास्टिक साहित्य या पथकाच्या निदर्शनास आले. त्यांनी दुकानदाराला पाच हजार रुपयांचा दंड करणारी पावती तयार केली. पावती तयार होताच बाळाराम देवासी यांनी विरोध करून अधिकाऱ्यांना दमदाटी केली.
--------------------
कुंडी फेकून मारण्याचा प्रयत्न
भैरी भवानी सुपर मार्केटच्या दुकानदाराला दंडाची पावती दिली. शिवाय अधिकाऱ्यांनी रस्त्यावर ठेवलेले दुकानातील साहित्य जप्त करण्यासाठी अतिक्रमण विरोधी पथकाला बोलावले असता बाळाराम देवासी यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून कुंडी फेकून मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात उपमुख्य स्वच्छता निरीक्षक हेमंत चौधरी यांच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. याबाबत वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.