
गर्भाशयातून काढली मृत गर्भाची हाडे
मुंबई, ता. ५ : नवजात अर्भकाला नवजीवन दिल्याची बातमी ताजी असताना कांदिवलीतील पालिका संचालित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील डॉक्टरांनी आणखी एका महिलेचे प्राण वाचवले आहेत. महिलेच्या गर्भाशयातून गर्भाच्या हाडांचे (लिथोपेडियन) अवशेष काढून टाकण्यात डॉक्टरांना यश आले आहे. उत्तर प्रदेशमध्ये डॉक्टरांनी गर्भपात योग्य प्रकारे न केल्यामुळे संबंधित महिलेच्या गर्भाशयात चार हाडे तशीच राहिली होती. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जर ती काढली नसती तर महिलेचा जीव धोक्यात आला असता आणि ती गर्भधारणाही करू शकणार नव्हती.
गोरेगावमध्ये राहणारी २७ वर्षीय महिला गेल्या वर्षी २०२२ मध्ये गर्भवती होती. काही वैद्यकीय कारणांमुळे जोडप्याने मेडिकल टर्मिनेशन प्रोसिजर (एमटीपी) करण्याचा निर्णय घेतला; मात्र ती १३ आठवड्यांची गर्भवती होती. त्यामुळे उत्तर प्रदेशातील डॉक्टरांनी तिच्यावर ‘डी ॲण्ड सी’ केले. ‘डी ॲण्ड सी’ एक अशी प्रक्रिया आहे, जी एखाद्या समस्येत म्हणजे गर्भपात किंवा असामान्य गर्भाशयाच्या रक्तस्रावावेळी केली जाते. ‘डी ॲण्ड सी’नंतर काही आठवड्यांनंतर महिलेमध्ये आरोग्यविषयक समस्या जाणवू लागली. कुटुंबीयांनी तिला मुंबईत आणले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील स्त्रीरोग विभागात दाखवले. विभागप्रमुख डॉ. निमिष टुटवाला यांनी सांगितले, की संबंधित महिलेला आठवडाभरापासून रक्तस्राव आणि पोटदुखीची तक्रार जाणवत होती. सोनोग्राफीच्या अहवालात गर्भाशयात हाडे असल्याचे दिसून आले. वंध्यत्वासाठी हिस्टेरोस्कोपी घेतलेल्या ०.१५ टक्के रुग्णांमध्ये अशी दुर्मिळ समस्या आढळते. दोन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर गर्भाशयातील चार हाडे काढण्यात आली. हिस्टेरोस्कोपिक काढले नसते तर सेप्सिसचा धोका होता आणि त्यात महिलेचा मृत्यूही होण्याचा धोका होता, असे डॉक्टरांनी सांगितले.
रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. प्रतिमा पाटील म्हणाल्या, की संबंधित आरोग्यविषयक समस्या दुर्मिळ अशी आहे. आमच्या डीएनबी शिक्षक आणि डॉक्टरांच्या टीमने अशी दुर्मिळ केस सक्षमपणे हाताळली याचा आम्हाला आनंद आहे.
उपनगरीय रुग्णालयांमध्ये डीएनबी अभ्यासक्रम सुरू केल्याचा फायदा रुग्णांना होत आहे. मोठ्या रुग्णालयांवरील अवलंबित्वही कमी झाले आहे. आमचे वरिष्ठ आणि अनुभवी डॉक्टर जटील शस्त्रक्रियाही करू शकतात.
- डॉ. विद्या ठाकूर, मुख्य वैद्यकीय अधीक्षक, उपनगरीय रुग्णालय