कचरा वर्गीकरणाला गती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कचरा वर्गीकरणाला गती
कचरा वर्गीकरणाला गती

कचरा वर्गीकरणाला गती

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ८ ः नवी मुंबई शहरातील स्वच्छतेची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्यासाठी व त्यामध्ये सुधारणा आणण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी क्षेत्रीय स्वच्छता पाहणी दौऱ्यांना सुरुवात केली. नेरूळ शिरवणे भाग, वाशी, कोपरखैरणे अंतर्गत भागांसह एमआयडीसी क्षेत्र व इंदिरा नगर तुर्भे भागातील स्वच्छतेची पाहणी करून आयुक्तांनी कचरा संकलनाबरोबरच वाहतूक पद्धतीतून कचरा वर्गीकरण अधिक गतिशील बनवण्यावर भर दिला आहे.
नवी मुंबई महापालिकेने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नियोजन केले आहे; मात्र त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने शंभर टक्के शहर स्वच्छ ठेवण्यात अपेक्षित यश पालिकेला मिळत नाही. त्यामुळे स्वच्छ नवी मुंबईच्या संकल्पनेसाठी घरातील ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरणावर अधिक भर दिला जात आहे. तसेच या कचऱ्याचे वर्गीकरण करूनच त्यांचे संकलन महापालिकेच्या कचरा गाड्यांमध्ये करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे कचरा संकलनाच्या या प्रक्रियेसाठी आता आयुक्तांनी विभागवार दौऱ्यातून जनसंवाद साधण्यावर भर दिला आहे. सद्यस्थितीत कचरा संकलनासाठी ७७ रिफ्युज कॉम्पॅक्टरसारख्या मोठ्या गाड्या तसेच लहान गल्ल्यांमध्ये जाण्यासाठी ७२ मिनी टिप्परचा वापर पालिकेकडून केला जात आहे. त्यामुळे या गाड्यांमध्ये ओला व सुका कचरा वाहून नेण्यासाठीचे स्वतंत्र कप्पे तसेच त्यातून ओला व सुका कचऱ्याच्या होणाऱ्या वर्गीकरणावर आयुक्तांकडून बारकाईने लक्ष ठेवले आहे. याशिवाय टिप्परमध्ये घरगुती घातक कचरा, ई-कचरा असेही स्वतंत्र कप्पे असून त्यामध्येही तशाच प्रकारचा कचरा ठेवला जात असल्याबाबत त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून खातरजमा केली जात आहे.
------------------------
रस्त्यालगतच्या पार्किंगचा अडथळा
शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणावर गाड्या पार्किंग केल्या जात असल्याने स्वच्छता कामात गाड्यांचा अडथळा होत असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले आहे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी गॅरेज आहेत, त्या रस्त्यांच्या पदपथावरही दुचाकी पार्किंग करून ठेवली जात असल्याने स्वच्छता कामात अडचण येत असल्याने याबाबतचा अहवाल तयार केला जाणार आहे.
------------------------------
झोपडपट्टीतील खत कुंड्यांची पाहणी
‘झिरो वेस्ट स्लम मॉडेल’ ही झोपडपट्टी भागातील कचरा संकलनासाठी अत्यंत प्रभावी ठरलेली उपाययोजना असून प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेल्या ५ मॉडेलपैकी इंदिरानगर तुर्भे भागातील प्रकल्पस्थळाला भेट देत आयुक्तांनी झोपडपट्टीतील गल्लोगल्ली जाऊन कचरा संकलन पद्धती, वेगवेगळ्या डब्यांत गोळा झालेल्या कचऱ्याच्या कंपोस्टिंग प्रक्रियेची आयुक्तांनी पाहणी केली. तसेच तेथील कचरा वेचक महिलांशी संवाद साधत संपूर्ण प्रणाली जाणून घेतली.