
राहुल गांधी यांच्या हजेरीवर भिवंडी न्यायालयात १ एप्रिलला सुनावणी
भिवंडी, ता. ५ (बातमीदार) : महात्मा गांधी यांची हत्या आरएसएस कार्यकर्त्यांनी केल्याचे राहुल गांधींनी म्हटल्याप्रकरणी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल आहे. या याचिकेवर भिवंडी जलदगती न्यायालयात शनिवारी (ता. ४) सुनावणी पार पडली. या प्रकरणाची पुढील सुनावणी १ एप्रिल रोजी होणार असल्याचे न्यायाधीश एल. सी. वाडीकर यांनी सांगितले. पुढील सुनावणीला राहुल गांधी यांच्याविरोधातील खटला त्यांचे वकील चालविणार असून त्यांना कायमस्वरूपी सूट मिळणार की नाही, याबाबत निर्णय होणार आहे.
खासदार राहुल गांधी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान भिवंडीतील जाहीर सभेत केलेल्या वक्तव्यात आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांची हत्या केली, असा आरोप केला. या प्रकरणी भिवंडी न्यायालयामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भिवंडीतील पदाधिकारी राजेश कुंटे यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा दावा केला. त्या मानहानीबाबतच्या सुनावणीदरम्यान राहुल गांधी यांची बाजू अॅड. नारायण अय्यर यांनी मांडली. त्यांनी सांगितले की, राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीत वकील त्यांचे प्रतिनिधित्व करतील आणि खटला पुढे चालवतील, या आधारावर कायमस्वरूपी सूट मिळावी म्हणून न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला. गांधी यांनी मागितलेल्या सुनावणीसाठी हजर राहण्यापासून कायमस्वरूपी सूट देण्याच्या मुद्द्यावर १ एप्रिल २०२३ रोजी युक्तिवाद केला जाणार आहे.