
परीक्षेपूर्वी विद्यार्थ्याच्या मोबाईलवर प्रश्नपत्रिका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मुंबईत बारावीची गणिताची परीक्षा सुरू होण्यापूर्वी जवळपास पाऊण तास विद्यार्थ्यांना मोबाईलवर प्रश्नपत्रिका मिळाल्याचे समोर आले आहे. बारावीच्या गणिताची प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲपवर पाठवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी ५ मार्चला अहमदनगर येथून एका संशयिताला ताब्यात घेतले.
दादर येथील अँटॉनिओ डिसिल्वा हायस्कूलमधील शिक्षिकेच्या तक्रारीवरून याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ताब्यात घेण्यात आलेला आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती मिळत आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी याप्रकरणी तीन परीक्षार्थींसह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दादरच्या अँटॉनिओ डिसिल्वा हायस्कूलमधील परीक्षा केंद्रात या विद्यार्थ्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला होता. १० वाजून १७ मिनिटांनी त्याला प्रश्नपत्रिकेचा काही भाग मिळाल्याचे मोबाईलची तपासणी करता उघड झाले होते. याप्रकरणी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
...
शिवाजी पार्क पोलिसांकडे तक्रार
३ मार्चला १२ वी विज्ञान शाखेची गणिताची परीक्षा होती. पर्यवेक्षक रॉबीन परेरा यांनी विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका स्वीकारल्या त्या वेळी एका विद्यार्थ्याकडे मोबाईल सापडला. व्हॉट्सॲप तपासणीत १० वाजून १७ मिनिटांनी त्याला एका मित्राने गणिताची प्रश्नपत्रिका पाठवल्याचे निष्पन्न झाले. तसेच प्रश्नपत्रिकेची उत्तरेदेखील १० वाजून २० मिनिटांनी मागवण्यात आली होती. त्यानुसार याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती.
...
मुख्य आरोपीची शोध सुरू
गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पथक याप्रकरणी तपास करत असताना या प्रकरणाचे धागेदोरे अहमदनगरपर्यंत गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी नगर येथून एका अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपीची ओळख पटली असून त्याचा शोध सुरू असल्याचे माहिती मिळत आहे.