पालिकेची तीन आरोग्यवर्धिनी केंद्रे सेवेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिकेची तीन आरोग्यवर्धिनी केंद्रे सेवेत
पालिकेची तीन आरोग्यवर्धिनी केंद्रे सेवेत

पालिकेची तीन आरोग्यवर्धिनी केंद्रे सेवेत

sakal_logo
By

विरार, ता. ७ (बातमीदार) : १५ व्या वित्त आयोगातून वसई-विरार महानरपालिकेसाठी आरोग्यवर्धिनी केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी तीन आरोग्यवर्धिनी केंद्रांचे उद्‍घाटन पार पडले. यामध्ये चंदनसार जवळील कोपरी, डोंगरपाडा आणि नायगाव पूर्वेकडील प्रेरणा नगर येथील केंद्राचा समावेश आहे. नव्याने सुरू झालेल्या या केंद्रामुळे पालिका हद्दीतील नागरिकांना पालिकेच्या आरोग्य सेवेचा अधिकाधिक लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
वसई-विरार महापालिकेला १५ व्या वित्त आयोगानुसार पालिका हद्दीत १२ आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे पालिका हद्दीत गरजेच्या विविध ठिकाणी ही केंद्रे उभारण्याचे पालिकेने ठरवले आहे. यातील चार आरोग्यवर्धिनी केंद्रांचा शुभारंभ पालिकेतर्फे करण्यात आला आहे. ही चार केंद्रे वैतरणा येथील फणसपाडा, विरार येथील फुलपाडा, नालासोपारा येथील उमरोळी आणि वसई पश्चिमेच्या माणिकपूर येथे सुरू करण्यात आली आहेत. यातील तीन केंद्रे पूर्णपणे तयार झाली असून त्याचे उद्‍घाटन करण्यात आले.
कोपरी आणि डोंगरपाडा येथील आरोग्य केंद्राचे नालासोपाराचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आयुक्त अनिलकुमार पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काशिनाथ पाटील, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी तसेच माजी नगरसेवक उपस्थित होते. नायगाव प्रेरणा नगर येथील आरोग्य केंदाचे उद्‍घाटन खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे, माजी नगरसेवक कन्हैया भोईर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या केंद्रामध्ये एक आरोग्य अधिकारी, परिचारिका, एएनएम, सफाई कर्मचारी आणि बहुउद्देशीय कर्मचारी कार्यरत असणार आहेत.

=======================================
आरोग्यवर्धिनी केंद्रातील सुविधा
- गरोदर माता आरोग्य तपासणी
- टेलिकन्सल्टेशन
- लसीकरण
- आरोग्याबाबत जनजागृती
- रुग्णांची प्राथमिक तपासणी (ओपीडी)
- मोफत औषधे, तपासणी आणि रक्त चाचणी