उपनगरांत होळीचा उत्‍साह

उपनगरांत होळीचा उत्‍साह

मुंबई, ता. ७ ः होळी व धूलिवंदन सण मुंबईसह उपनगरांमध्‍ये मोठ्या उत्‍साहाने साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी परंपरागत होळीचे दहन करण्यात आले; तर काही ठिकाणी भ्रष्‍टाचार, अविचार यांचे प्रतीकात्‍मक दहन करण्यात आले. कोरोनाकाळानंतर प्रथमच निर्बंधमुक्‍त वातावरणात सण साजरे होत असल्‍याने सर्वत्र उत्‍साहाचे वातावरण पहायला मिळाले. विशेष करून तरुण, लहान मुले यंदा मोठ्या संख्‍येने सहभागी झाल्‍याचे चित्र उपनगरांत पहायला मिळाले.

माहीम कोळीवाड्यात पारंपरिक होळी
वडाळा, ता. ७ (बातमीदार) ः होळी सण मुंबईतील कोळीवाड्यांमध्ये पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबईतील माहीम कोळीवाड्याची आगळी-वेगळी नवसाला पावणारी अशी ख्याती असलेली होळी माहीमच्या कोळीबांधवांनी सोमवारी (ता. ६) थाटामाटात साजरी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे होळी सण समूहाने साजरा करणे शक्य झाले नाही; मात्र यंदा मोठ्या उत्साहात होळी सण साजरा करण्यात आला. माहीम झोपडपट्टी मच्छीमारनगर या कोळीवाड्यात काळानुसार बदल होऊन माहीम मच्छीमारनगर स्थापन झाले आहे; तरीही येथील कोळी बांधवांनी होळी सण साजरा करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. गेली ६९ वर्षे हा होळी उत्सव साजरा केला जातो. कोळी बांधवांची होळी अशी जरी ओळख असली, तरी आजच्या घडीला सर्व समाजातील लोक एकत्र येत हा सण मोठ्या जल्लोषात साजरा करतात, असे कोळीवाड्यातील रहिवासी विलास पंढरीनाथ तामोरे यांनी सांगितले.

अशी आहे परंपरा
होळीचा उत्साह आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळतो. त्यानुसारच माहीम कोळीवाड्यातीलदेखील पिढ्यान् पिढ्या चालत असलेली पारंपरिक होळीची एक वेगळीच सुरुवात येथील कोळीबांधव होळी सणाच्या दोन दिवस आधीपासूनच करतात. निसर्गाच्या सान्निध्यात महत्त्वपूर्ण असलेल्या सुपारीच्या झाडावर भेंडीच्या झाडांच्या फांद्या लावून सजावट केली जाते. त्याच्याभोवती रांगोळी घातली जाते, झाडाची आकर्षक फुलांच्या माळांनी, फुग्यांनी सजावट केली जाते. भेंडीच्या झाडासोबत तिवरांच्या झाडाच्यादेखील पूजा करण्याची प्रथा आहे, तिवर हे समुद्राचे रक्षक असल्याने कोळीबांधव तिवराची एक डहाळ भेंडीच्या झाडासोबत पूजतात. सजवलेल्या झाडा भोवती कोळी नृत्याचा ठेका धरला जातो अशा प्रकारे आजही येथील कोळीबांधव मोठ्या श्रद्धेने व भक्तिभावाने होळीउत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करतात.

विठाई प्रतिष्ठानची विशेष मुलांसाठी होळी
मुलुंड, ता. ७ (बातमीदार) ः विठाई प्रतिष्ठानतर्फे विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जातात याच अनुषंगाने धर्मवीर आनंद दिघे ‘जिद्द’ या विशेष मुलांच्या शाळेमधील मुलांसोबत गेली १९ वर्षे विठाई प्रतिष्ठानतर्फे होळी सण साजरा केला जातो. होळीनिमित्त यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद कोणत्याच दुकानात विकत मिळणार नाही; ही निःस्वार्थ भावना आम्ही गेली अनेक वर्षे मनात बाळगून आहोत, असे गौरवोद्गार विठाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित चव्हाण यांनी या वेळी काढले.

जोगेश्‍वरीत होळी व धूलिवंदनाचा जल्‍लोष
जोगेश्वरी, ता. ७ (बातमीदार) ः जोगेश्वरीत पारंपरिक पद्धतीने होळी व रंगपंचमीत रंगाची मुक्‍त उधळण करत उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे काढून टाकल्‍याने यावर्षी जागोजागी होळी दहनाचा कार्यक्रम मोठ्या हर्षोल्लासात व आनंदात साजरा करण्यात आला; तर दुसऱ्या दिवशी गल्लोगल्ली रंगपंचमी लहान मुलांनी मोठ्या उत्साहात साजरी केली.
जोगेश्वरी पूर्वेच्या सर्वोदय नगर मार्गावरील दत्तमंदिर परिसरात होळी दहनाचा कार्यक्रमाला साई मित्र मंडळाकडून प्रथम सुरुवात नऊ वाजता करण्यात आली व त्‍यानंतर होली दहनाचा कार्यक्रमला इतर ठिकाणी सुरुवात करण्‍यात आली; या ठिकाणी होली दहनासाठी नारळाची झावळी व त्‍याभोवती लावलेले नारळ, मोठे पुठ्ठे, करवंट्या, लाकडे इत्‍यादी टाकाउ वस्तूंचा उपयोग करून पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजा अर्चा करून लोकांच्या उपस्थितीत होळीचे दहन करण्यात आले.
या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये व नियमांचे पालन व्हावे म्हणून मेघवाडी पोलिसाचा विभागात कडक बंदोबस्त लावण्यात येऊन पोलिसांची गस्‍तीवरील गाडीही सतत फिरत असल्याचे दिसत होते. कोरोनामुळे दोन वर्षभरापासून रंगपंचमी व्‍यवस्थित साजरी न करता आल्‍यामुळे बच्‍चेकंपनीसह इतर मंडळीने या वर्षी मात्र सर्व निर्बंध हटविल्‍यामुळे मुक्‍तपणे दुसऱ्या दिवशी मुक्तवावर करत सर्वोदयनगरच्‍याच म्हाडा कॉलनी परिसरातील लहान मुलांनी व सर्वांनी रंगपंचमी आपआपल्‍या गल्लीतच एकमेकांवर फुगे मारत व रंगाची उधळण करत बच्चेकंपनीने उत्साहात व जल्लोषात साजरी केली.

पालिका अधिकाऱ्यांनी घेतला होळीचा आनंद
घाटकोपर, ता. ७ (बातमीदार) ः देशभरात नागरिकांनी विविध रंगांची उधळण करत होळी साजरी केली. मुंबई पालिका कर्मचारी व अधिकारी यांनीदेखील या वेळी होळीचे रंग एकमेकांना लावत शुभेच्छा दिल्या. एन वॉर्ड येथे कामकाजाची वेळ संपल्यानंतर पालिकेत अधिकाऱ्यांनी काही मिनिटे एकमेकांच्या चेहऱ्याला रंग लावत शुभेच्छा दिल्या. सहायक आयुक्त संजय सोनवणे यांनी कर्मचारी व अधिकारी यांच्यासमवेत होळीचा आनंद घेत त्यांच्याशी खास होळीच्या गप्पागोष्टी केल्या.

अमिताभ बच्चन यांची प्रकृती सुधारण्यासाठी होलिकामातेला प्रार्थना
घाटकोपर, ता. ७ (बातमीदार) ः सिनेसृष्टीतील सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी, यासाठी घाटकोपर येथील मंडळांनी होलिका मातेला प्रार्थना केली. ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाच्‍या चित्रीकरणादरम्यान अमिताभ बच्‍चन यांना अपघात झाला आहे. त्यांना उपचारासठी मुंबईला आणले आहे. त्‍यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी घाटकोपर येथील मंडळांनी होळी मातेला प्रार्थना केली.

बच्चेकंपनी रंगले रंगात
प्रभादेवी, ता. ७ (बातमीदार) : आपल्या सणांची माहिती लहान वयातच मुलांना कळावी त्यांना आनंद मिळावा, यासाठी प्रभादेवी येथील गिगल्स नर्सरी स्कूलमध्ये नैसर्गिक रंगाच्‍या रंगपंचमीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुलांनी एकमेकांना रंग लावून बच्चे कंपनीने धूलिवंदन सण उत्साहात साजरा केला. या वेळी शिक्षिका ऊर्मी शाह, कोमल संघवी, ममता चौहान, राधिका लेले, निशा सोळंकी, मुस्कान चौहान यांच्या मार्गदर्शनााखाली मुलांनी सफेद रंगाच्या बोर्डवर फुग्यांनी रंग उमाटविले, स्प्रे केले तसेच टी शर्ट देखील रंगवून धमाल केली.

दादा प्रतिष्ठानतर्फे मोफत रंगवाटप
घाटकोपर, ता. ७ (बातमीदार) ः घाटकोपर येथील दादा प्रतिष्ठान या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेमार्फत सोमवारी विभागात नागरिकांना नैसर्गिक रंग मोफत वाटप करण्यात आले. त्वचेला हानी करणाऱ्या रंगाचा वापर न करता नैसर्गिक रंग वापरून पाण्याचीदेखील बचत या संकल्पनेतून प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू पवार यांनी विभागात रंगांचे वाटप केले. भीमनगर, गोळीबार रोड, गणेश चौक, अंधेरी लिंक रोड येथे या प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी रंग वाटप केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com