
कुंभे रस्त्याला ३० वर्षांनंतर संजीवनी
नेरळ, ता. ७ (बातमीदार) : कर्जत तालुक्यातील नेरळ शहराजवळ असलेल्या कुंभे गावाला गेले अनेक वर्षे रस्त्याची प्रतीक्षा होती. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हा रस्ता होईल, असा शब्द आमदार महेंद्र थोरवे यांनी दिला होता. हा शब्द पूर्ण करत या रस्त्यासाठी एमएमआरडीए अंतर्गत ५० लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली. नुकतेच या रस्त्याचे भूमिपूजन आमदार थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले.
नेरळ शहराजवळ जिते ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या कुंभे गावाला तीन रस्ते आहेत. त्यातील वाकस पूल ते कुंभे रस्त्याचा वापर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात होतो. या रस्त्यालगतच नेरळ व माथेरान पंप हाऊसदेखील आहे. तरी देखील हा रस्ता गेले अनेक वर्षे रखडलेला होता. संपर्कप्रमुख अतिश भोईर यांनी या रस्त्यासाठी सातत्याने आमदार थोरवे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यामुळे एमएमआरडीएकडून ५० लाख निधीची तरतूद करण्यात आली आहे. या रस्त्याचे भूमिपूजन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले आहे. त्यामुळे ३० वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्याला नवसंजीवनी मिळाली आहे. या वेळी ज्येष्ठ नागरिक बापू भोईर, कृष्णा भोईर, जिते ग्रामपंचायत सदस्य तुकाराम भोईर, वंदना भोईर, शोभा घरत, प्रसाद तोंडलेकर, रंभाजी भोईर, दत्ता भोईर, विठ्ठल कालोखे, दत्ता धारने, बाळाराम बोरडे, दिलीप भोईर, अनिल भोईर, दीपक भोईर, लिबाजी भोईर, पांडुरंग भोईर, गुरुनाथ भोईर, प्रभाकर जाधव, चंद्रकांत हजारे, राजेश जाधव, गणेश जाधव, योगेश जाधव, गोपीनाथ जाधव, विनायक घरत, विक्रम घरत उपस्थित होते.