स्तनांच्या कर्करोगाची महिलांमध्ये चित्ररथातून जागृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्तनांच्या कर्करोगाची महिलांमध्ये चित्ररथातून जागृती
स्तनांच्या कर्करोगाची महिलांमध्ये चित्ररथातून जागृती

स्तनांच्या कर्करोगाची महिलांमध्ये चित्ररथातून जागृती

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : कर्करोगाची लागण झाल्यानंतर अनेकांच्या अंगातील त्राण निघून जातात. त्यात या आजाराची लागण झाल्याने त्यांचे आता कसे होणार, यातून बरे होणार की नाही, अशा अनेक प्रश्नांचे काहूर कर्करोगग्रस्तांच्या मनात निर्माण होत असतात; मात्र या कर्करोगाशी धीराने सामना करून त्यावर ठाण्यातील एका ६१ वर्षीय महिलेने मात करीत कर्करोगाला हरवले आहे. या ज्येष्ठ महिलेने कर्करोगावर केलेली यशस्वी मात, यातून इतर रुग्णांना मानसिक बळ मिळावे, या उद्देशाने यंदाच्या गुढीपाडव्यानिमित्त स्वागतयात्रेत त्यांनी साकारलेल्या चित्ररथाचा समावेश करण्यात आला आहे.

ठाण्यातील बेथनी रुग्णालय परिसरातील रौनक पार्क गृहसंकुलात आरती गोरडे या वास्तव्यास आहेत. आरती यांच्या पतीचे २६ वर्षांपूर्वी निधन झाले. दु:खाचा डोंगर कोसळलेल्या आरती यांनी अतिशय कष्ट करून त्यांच्या मुलीला एकल पालक म्हणून वाढवले. त्यानंतर त्यांची मुलगी काही कारणास्तव परदेशात गेली. वयाच्या ५९ व्या वर्षी आरती यांना कर्करोग असल्याचे समजले. घरी एकट्या असलेल्या आरती यांना कोरोनासारख्या संसर्गजन्य आजाराच्या काळात गृहसंकुलातील रहिवासी आणि जिवाभावाच्या मैत्रिणींनी कर्करोगातून सावरण्यासाठी मानसिक आधार दिला. डॉक्टरांच्या मदतीने आणि योग्य उपचारांमुळे त्या आता पूर्णपणे ठणठणीत झाल्या आहेत. कर्करोगासारख्या भयंकर आजारातूनही माणूस पूर्णपणे बरा होतो, हे नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी आणि कर्करोगग्रस्तांनाही बळ मिळावे यासाठी त्या नववर्ष स्वागत यात्रेनिमित्ताने चित्ररथातून जनजागृती करणार आहेत.

फलकातून जनजागृती
स्वागतयात्रेच्या निमित्ताने साकारण्यात येणाऱ्या चित्ररथावर स्तनांचा कर्करोग होण्याची कारणे, लक्षणे आणि उपाय यासंदर्भातील विविध १२ फलक उभारण्यात येणार आहेत. तसेच ‘पाच मिनिटं, पाच लक्षणं’ नावाचे पथनाट्यदेखील सादर केले जाणार आहे. या चित्ररथासाठी आरती यांच्यावर उपचार केलेले डॉ. प्रीतम कालस्कर आणि डॉ. नीलेश चोरडिया हे सहकार्य करत आहेत.

दोन वर्षांपूर्वी मला स्तनांचा कर्करोग झाला होता. त्या वेळी अनेक प्रश्न डोळ्यांसमोर उभे राहिले; मात्र त्यातून मी सावरले आणि आता ठणठणीत आहे. तसेच कर्करोगग्रस्त महिलांना हिंमत देणे गरजेचे आहे. मुळात हा आजार जडल्यास तो लपवू नका, त्याची चर्चा करा. मुख्यतः स्तनाच्या कर्करोगाविषयी जागृती व्हावी, या हेतूने मी नववर्ष स्वागतयात्रेत ‘स्तनांचा कर्करोग’ हा विषय निवडला.
- आरती संजीव गोरडे