
डहाणूतील तलाव सुशोभीकरण रेंगाळत
कासा, ता. ७ (बातमीदार) : डहाणू नगर परिषद हद्दीत असणाऱ्या तीन तलावांचे सुशोभीकरणाचे काम नगर परिषदेमार्फत हाती घेण्यात आले होते. तलावात असलेला गाळ, जलपर्णी आणि अन्य काही वनस्पतींची वाढ झाल्यामुळे तलावांचे विद्रूपीकरण झाले होते. यासाठी तलावांची साफसफाई करून रंगरंगोटी करण्याचे ठरले असताना अजूनही काम अपूर्णच असल्याचे दिसत आहे.
डहाणू नगर परिषद हद्दीत डहाणू गाव, मसोली आणि पारनाका येथील कमळ तलाव असून येथील नागरिकांना या तलावाजवळ सकाळ-संध्याकाळ वॉकिंग, फिरणे यासाठी वापर व्हावा, अशी योजना आहे. यासाठी सध्या तलावात असलेला गाळ, जलपर्णी आणि अन्य काही वनस्पतींची वाढ झाल्यामुळे तलावांचे विद्रूपीकरण झाले होते. यामुळे तलावांची स्वच्छता करून रंगरंगोटी करून सुशोभित करण्याचे काम मंजूर करण्यात आले होते. यासाठी नगर परिषदेमार्फत १० लाखाच्या निधीची तरतूद करण्यात आली होती, अशी माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी दिली.
-------------
निधी अपुरा पडत असल्याचे कारण
तलाव सुशोभीकरणाचे काम दोन महिन्यांनंतरही अपूर्णच असल्याचे दिसत आहे. सद्यस्थितीत फक्त तलावांमधील गाळ, जलपर्णी काढून तलाव स्वच्छ करण्यात आले आहेत; पण रंगरंगोटीचे व सुशोभीकरणाचे काम अपूर्णच आहे. याविषयी नगर परिषदेने दिलेल्या माहितीनुसार तलावांसाठी मंजूर निधी सुशोभीकरण करण्यासाठी अपुरा पडत आहे. त्यामुळे अधिकच्या निधीची तरतूद करण्याचे प्रयत्न सुरू असून निधी मंजूर झाल्यावर तलावांचे सुशोभीकरण करण्याचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती देण्यात येत आहे.
-----------------
तलावांच्या सुशोभीकरणासाठी अधिकच्या निधीची तरतूद करण्याचे सुरू आहे. तलावाच्या स्वच्छतेसाठी १० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. सुशोभीकरणासाठी आणखी १५ लाख रुपयांची तरतूद करण्याचे सुरू आहे. निधी मंजूर झाल्यास सुशोभीकरणाचे काम पूर्ण करण्यात येईल.
- वैभव आवारे, मुख्याधिकारी, डहाणू नगर परिषद