
गोरेगाव येथे तरुणीची आत्महत्या
अंधेरी, ता. ८ (बातमीदार) ः गोरेगाव येथे राहणाऱ्या जोएना नावाच्या एका ३७ वर्षांच्या तरुणीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. लिंग परिवर्तन करूनही तिला कोणीही मुलगी मानत नव्हते, तिच्यासोबत मुलगी असल्याचा व्यवहार करत नव्हते. त्यातून आलेल्या मानसिक नैराश्यातून तिने जीवन संपविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. घटनास्थळाहून पोलिसांना एक सुसाईट नोट सापडली असून त्यात तिने तिची खंत व्यक्त केली आहे. दरम्यान, तिच्या मित्राची जबानी नोंदवून गोरेगाव पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे. तिच्या आत्महत्येची माहिती तिच्या कोलकाता येथे राहणाऱ्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. ही घटना रविवारी (ता. ५) सकाळी साडेदहा वाजता गोरेगाव येथील यशवंतनगर, रिद्धी-सिद्धी हाईट्स अपार्टमेंटच्या चौदाव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये उघडकीस आली.
जोएना ही मूळची कोलकाताची रहिवासी असून २०१८ मध्ये ती कोलकाता येथून मुंबईत नोकरीनिमित्त आली होती. तेव्हापासून ती तिच्या एका मित्रासोबत गोरेगाव येथील एका फ्लॅटमध्ये राहत होती. सकाळी तिचा मित्र एका सलूनमध्ये हेअर कटिंगसाठी गेला होता. साडेदहा वाजता तो फ्लॅटमध्ये आला असता त्याला जोएनाने घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. या घटनेनंतर त्याने तिला तातडीने गोरेगाव येथील एम. जी. रोडवर असलेल्या कपाडिया हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती नंतर हॉस्पिटल प्रशासनाकडून गोरेगाव पोलिसांना देण्यात आली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तपासात मृत महिलेचे नाव जोएना असल्याचे उघडकीस आले. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईट नोट सापडली आहे. त्यात तिने काही वर्षांपूर्वी लिंग परिवर्तन केल्याचे नमूद केले होते. लिंग परिवर्तन करून ती मुलगी झाली होती. मात्र तिला कोणीही मुलगी म्हणून स्वीकारत नव्हते. तिच्यासोबत मुलगी असल्याबाबत व्यवहार करत नव्हते. त्यामुळे ती मानसिक तणावात होती. त्यातूनच तिला प्रचंड नैराश्य आले होते. याच नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी तिच्या मित्रांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली असून त्याने तिच्या आत्महत्येबाबत कोणावरही संशय व्यक्त केला नाही. त्यामुळे पोलिसांनी एडीआरची नोंद करून तिच्या कुटुंबीयांना या आत्महत्येची माहिती दिली आहे. जोएनाचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता.