गडकिल्ल्यांसाठी स्थानिकांचे योगदान महत्त्वाचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडकिल्ल्यांसाठी स्थानिकांचे योगदान महत्त्वाचे
गडकिल्ल्यांसाठी स्थानिकांचे योगदान महत्त्वाचे

गडकिल्ल्यांसाठी स्थानिकांचे योगदान महत्त्वाचे

sakal_logo
By

भाईंदर, ता. ७ (बातमीदार): पेशव्यांचे वंशज पुष्करसिंह उदयसिंह पेशवे यांच्या प्रमुख उपस्थितीत चौक गावातील जंजीरे धारावी किल्ल्याचा विजयदिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. स्थानिक गडप्रेमी तसेच महापालिका किल्ल्याच्या संवर्धनासाठी करत असलेल्या विशेष प्रयत्नांबाबत पेशवे यांनी आनंद व्यक्त करून जंजीरे धारावी किल्ल्याप्रमाणे राज्यातील अन्य गड किल्ल्यांसाठी स्थानिकांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन केले.

नरवीर चिमाजी अप्पा यांनी जंजीरे धारावी किल्ला जिंकल्याच्या घटनेला २८४ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सोमवारी (६ मार्च) मिरा-भाईंदर महापालिकेकडून विजयदिन म्हणून साजरा करण्यात आला. या वेळी पेशव्यांचे वंशज पुष्करसिंह उदयसिंह पेशवे हे खास पुण्याहून उपस्थित झाले होते. गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण किल्ला दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाला होता. सोमवारी दुपारी सुरुवातीला इतिहासकालीन धारावी मंदिरात देवीची महाआरती करण्यात आली. त्यानंतर किल्ल्याच्या वरील भागात असलेल्या नरवीर चिमाजी अप्पांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नरवीर चिमाजी अप्पा यांचा अश्वारुढ पुतळा संपूर्ण महाराष्ट्रात केवळ वसई किल्ला व जंजीरे धारावी किल्ला या ठिकाणीच आहे. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी टाळ-लेझीम याच्या तालावर पालखी, सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडा, चिमाजी अप्पा यांचा इतिहास असा कार्यक्रम सादर केला. या वातावरणाने पुष्करसिंह पेशवे भारावून गेले. राज्य सरकार या किल्ल्यासाठी समर्थन देत आहेच, परंतु स्थानिकांकडून किल्ल्यासाठी देण्यात येत असलेले योगदानही विशेष महत्त्वाचे आहे. यामुळे खूपच आनंद वाटला. राज्यातील सर्वच ऐतिहासिक स्थळांसाठी असे स्थानिकांचे योगदान आवश्यक आहे, असे मत पुष्करसिंह पेशवे यांनी व्यक्त केले. आपल्या देशाला फार मोठा इतिहास लाभला आहे. हा इतिहास बाहेरच्या देशातील लोकांना कळावा व ते या ठिकाणी यावेत यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
--------------------------
हेरिटेज वॉक विशेष बससेवा सुरू होणार
किल्ल्याच्या सुशोभीकरणाचे तसेच संवर्धनाचे काम महापालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. जंजीरे धारावी तसेच घोडबंदर येथील किल्ला संवर्धनाचे काम पूर्ण झाल्यानंतर दोन्ही किल्ल्यांना पर्यटकांना भेट देता यावी यासाठी हेरिटेज वॉक ही विशेष बससेवा सुरू केली जाईल, असे आश्वासन आयुक्त दिलीप ढोले यांनी या वेळी दिले. आमदार गीता जैन, महापलिकेचे उपायुक्त संजय शिंदे, किल्ला जतन समितीचे रोहित सुवर्णा तसेच त्यांचे सहकारी व नागरिक मोठ्या संख्येने विजयदिनाला उपस्थित होते.