कॅनडात नोकरीच्या प्रलोभनाने फसवणूक

कॅनडात नोकरीच्या प्रलोभनाने फसवणूक

अंधेरी, ता. ७ (प्रतिनिधी) ः कॅनडात नोकरी देण्याच्या प्रलोभनाने एका व्यक्तीची सुमारे पावणेपाच लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी महिलेसह दोघांविरुद्ध चारकोप पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. भाग्यश्री बोंबले आणि मुकेश वैष्णव अशी या दोघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्याचा तपास सुरू असून लवकरच या दोघांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
५८ वर्षांचे तक्रारदार कांदिवलीतील चारकोप परिसरात त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतात. ते एका शाळेत काम करत होते. कोरोनानंतर काही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर त्यांना एका खासगी कंपनीत सहायक मॅनेजरची नोकरी मिळाली होती; तर त्यांची पत्नी सध्या शीव हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. त्याच परिसरात भाग्यश्री ही राहत असून त्यांच्याशी तिचे चांगले संबंध आहेत. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या कंपनीतून कॅनडामध्ये नोकरीची संधी असल्याचे सांगून त्यांच्या मोठ्या मुलासाठी ती नोकरीसाठी नक्की प्रयत्न करेल, त्यासाठी तिला तिचे कार्यालयातील अधिकारी मुकेश वैष्णव हे मदत करत असल्याचे सांगितले. इतर लोकांकडून कंपनी बारा लाख रुपये घेते; मात्र ते त्यांचे परिचित असल्याने त्यांच्या मुलासाठी नऊ लाख रुपये खर्च येईल असे सांगितले. कॅनडामध्ये चांगली नोकरी मिळत असल्याने तक्रारदारांनी त्यास होकार देत तिला डिसेंबर २०२० ते मे २०२१ या कालावधीत ६ लाख ९१ हजार रुपये दिले होते. पैसे दिल्याची पावतीही तिने त्यांना देऊन त्यांचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्‍यानंतर कॅनडा ॲप्लिकेशन सेंटरवर मुलाच्या अपॉइंटमेंटसाठी वेळ घेतल्याचे सांगून ती त्यांना टाळत होती. दरम्‍यान, तिथे संपर्क केल्यानंतर त्यांच्या मुलाच्या नावाने कुठलाही अर्ज प्राप्त झाला नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी या दोघांकडे पैशांची मागणी सुरू केली होती. सतत मागणी केल्यानंतर त्यांनी त्यांना २ लाख २० हजार रुपये परत केले; मात्र उर्वरित पावणेपाच लाखांचा अपहार करून त्यांची फसवणूक केली होती. या घटनेनंतर त्यांनी या दोघांविरुद्ध चारकोप पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर शनिवारी ४ मार्चला त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com