
महिलादिनी खेळ पैठणीचा रंगणार
माणगाव, ता. ७ (बातमीदार) : माणगाव नगरपंचायत महिला व बालकल्याण समितीतर्फे सिने अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत जागतिक महिलादिनी बुधवारी (ता. ८) सायंकाळी ५ वाजता अशोकदादा साबळे विद्यालयात होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम होणार आहे. तरी या कार्यक्रमात माणगाव नगरपंचायत हद्दीतील जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समिती सभापती नंदिनी बामगुडे, माजी सभापती तथा विद्यमान नगरसेविका शर्मिला सुर्वे व सर्व नगरसेविकांनी केले आहे.
कार्यक्रमाला सिने अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर व बालगायिका टी. व्ही. स्टार सह्याद्री मळेगावकर या उपस्थित राहून महिलांचे मनोरंजन करणार आहेत. कार्यक्रमासाठी पहिले, दुसरे आणि तिसरे बक्षीस पैठणी व आकर्षक भेटवस्तू आहेत. तर चौथे बक्षीस मिक्सर, पाचवे कुलर अशी आकर्षक बक्षिसे महिलांसाठी ठेवण्यात आली आहेत. या कार्यक्रमाची जोरदार तयारी माणगाव नगरपंचायत महिला व बालकल्याण समितीतर्फे करण्यात आली आहे. यानिमित्ताने माणगाव नगरीतील सर्व महिलांना ॲड. राजीव साबळे, नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक आनंद यादव, उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, सर्व नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी संतोष माळी व सर्व कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.