अवकाळी पावसाचा शिमगा

अवकाळी पावसाचा शिमगा

भिवंडी, ता. ७ (बातमीदार) : सोमवारी रात्री होळी झाल्यानंतर मध्यरात्रीपासून भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात अवकाळी पाऊस सुरू झाला. त्यामुळे होळीची रात्र जागविणाऱ्या तरुणांना घराचा रस्ता धरावा लागला. रात्रभर सुरू असलेल्या या अवकाळी पावसामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांवर पाणी साचले होते, तर काही ठिकाणी रस्ते चिखलमय झाले होते. या चिखलमय रस्त्यातून मार्ग काढताना मंगळवारी दिवसभर नागरिकांना मोठी कसरत करावी लागली होती.
शहराबरोबरच ग्रामीण भागातदेखील अवकाळी पावसाने हजेरी लावली असल्याने ग्रामीण भागात शेतकऱ्यांसह वीट उत्पादकदेखील हवालदिल झाले असून अनेक वीटभट्टी मालकांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. कच्च्या आणि भाजलेल्या पक्क्या तयार विटांवर प्लास्टिक टाकण्यात वीट उत्पादकांची मोठी धावाधाव झाली होती. विटांसाठी तयार केलेल्या मालाचा पावसामुळे गाळ झाल्याने तसेच कच्च्या विटा भिजल्याने पुन्हा विटा बनविण्याचा भुर्दंड अनेक वीटभट्टी मालकांना बसणार आहे. तसेच पावसामुळे शेतकऱ्यांची शेतीदेखील खराब झाली असून, त्यांचेदेखील या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असल्याने सरकारने शेतकऱ्यांना आणि वीटभट्टी मालकांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून आणि वीट उत्पादकांकडून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com