
अभय संरक्षण केंद्रात सुविधा निर्माण करा
वसई, ता. ७ (बातमीदार) : वसई तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयाच्या संकुलाच्या आवारातील महिला व बाल विकास अभय संरक्षण केंद्र या कार्यालयात नागरी सुविधांचा अभाव असल्याने समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे शिव विधी व न्याय सेनेच्या पालघर जिल्हा पदाधिकाऱ्यांनी पालघर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मल्लिनाथ एम. कांबळे यांची भेट घेतली व सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी केली आहे.
वसई तालुक्यात महिन्याला सरासरी शेकडोंच्या आसपास कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे दाखल होत असताना संबंधित वसई येथील महिला बाल विकास विभाग यांच्या वसई तालुका अभय संरक्षण अधिकारी कार्यालयात गेले सहा महिने वीजबिल थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. असे असताना अंधारातच कार्यालयीन कामकाज चालू होते. अपुरी साधनसामग्री असल्याने येणारे पक्षकार व वकिल यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
शिव विधी सेनेचे जिल्हा अध्यक्ष ॲड. दिनेश आदमणे, जिल्हा चिटणीस ॲड. वैभव पाटील व ॲड. गिरीष दिवाणजी यांनी महिला बाल विकास जिल्हा अधिकारी मल्लिनाथ एम. कांबळे यांचे लक्ष वेधून घेतले. थकित वीजबिल तत्परतेने भरून साधनसामग्रीबाबत आम्ही निविदा काढल्या असून लवकरच या समस्येबाबत निपटारा होईल, असे अधिकाऱ्यांनी आश्वासित केले आहे.
-------------
केवळ चार पदांची भरती
पालघर जिल्ह्याला नवीन बाल न्यायालय व जिल्हा महिला बाल विकास विभाग कार्यालयाला वर्ग १ व वर्ग २ सोबत ११ पदे मंजूर असताना केवळ दोन अधिकारी यांच्यावर कार्यभार चालला आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यांना स्वतंत्र संरक्षण अधिकारी असताना केवळ चार पदे भरली गेली असल्याने रिक्त पदे व अपुरा कर्मचारी पुरवठा, विधी सल्लागार यांची नियुक्ती अशा अनेक प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली.