आरटीई प्रवेशासाठी पालकांची झुंबड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरटीई प्रवेशासाठी पालकांची झुंबड
आरटीई प्रवेशासाठी पालकांची झुंबड

आरटीई प्रवेशासाठी पालकांची झुंबड

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. ८ (वार्ताहर)ः शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलाच्या पहिली आणि नर्सरीच्या प्रवेशासाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेला पालकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. पनवेल तालुक्यातील ११० शाळांमध्ये १ मार्चपासून याबाबतची अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून सात दिवसांत १५ हजार ११७ पालकांनी मुलांचे अर्ज भरले आहेत.
आरटीई प्रवेशप्रक्रियेद्वारे स्वयंअर्थसहाय्यित खासगी विनाअनुदानित, खासगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये मोफत प्रवेश व शिक्षण देण्यात येते. प्रवेश प्रक्रियेला बुधवारी (ता. १) सुरुवात झाली असून पालकांना मुलांच्या प्रवेशासाठी १७ मार्चपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यास मुदत देण्यात आली आहे. यंदा पनवेल तालुक्यासाठी आरटीई प्रवेशाकरिता ११० शाळा असून, त्यामध्ये २ हजार २०० जागा उपलब्ध आहेत. यासाठी केवळ सात दिवसांत १५ हजारांहून जास्त पालकांनी आपल्या पाल्यांचे अर्ज नोंदवल्याचे दिसून आले आहे. तसेच येत्या दहा दिवसांत यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
-----------------------------------------
प्रवेशासाठी आणखी एक पर्याय
आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पालकांची वेबसाईटवर अर्ज करण्यासाठी झुंबड उडाली होती. त्यामुळे आरटीईची वेबसाईट हँग झाली होती. सध्या पालकांना आरटीई प्रवेश अर्ज भरण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन संकेतस्थळाला अडचणी येऊ शकतात. त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा, अशी सूचना आरटीई पोर्टलवर देण्यात आली आहे. तसेच आता आणखी एक लिंकदेखील पोर्टलवर उपलब्ध करून दिली आहे.
---------------------------------------------
आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रिया ही पारदर्शक असून वैध अर्जांमधून लॅाटरी पद्धतीने प्रवेश दिले जाणार आहेत. अर्ज करायचे राहिले असतील त्यांनी १७ तारखेच्या आत पाल्यांचे अर्ज भरावेत.
- सीताराम मोहिते, गट-शिक्षण अधिकारी, पनवेल