
दोन दिवसीय आरोग्य शिबिर
घाटकोपर, ता. ८ (बातमीदार) ः ऊर्जा फाऊंडेशन व आरोग्य भारती यांच्या संयुक्त विद्यमाने होलिस्टिक हेल्थ आणि आरोग्य शिबिरचे आयोजन करण्यात आले आहे. भाईंदर येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत ११ व १२ मार्चला हा कार्यक्रम पार पडणार आहे. डॉ. विजय जंगम (स्वामी) यांच्या नेतृत्वाखाली ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.
याबाबत माहिती देताना आयोजक डॉ. विजय जंगम (स्वामी) यांनी सांगितले, की ही आंतरराष्ट्रीय परिषद जगभरातील सर्वांगीण आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सेवा प्रणालींच्या फायद्यांबद्दल जागरुकता पसरवण्यासाठी वचनबद्ध असलेल्या होलिस्टिक हेल्थकेअर संस्था, व्यावसायिक, वैद्य आणि तज्ज्ञांना एकत्र आणण्यास समर्थ असे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ असेल. या परिषदेत जगभरातील अनेक देशांमधून पाच हजारांहून अधिक प्रतिनिधी आणि पाचशेहून अधिक तज्ज्ञ, संशोधक, आरोग्य वैज्ञानिक उपस्थित असतील. या परिषदेत इंटिग्रेटेड मेडिसिन धोरणाबद्दल जागरुकता आणि आरोग्य सेवेचे भविष्य या विषयांवर पॅनेल चर्चा, कार्यशाळा आणि मुख्य भाषणे यांचा समावेश असेल. तसेच या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून सर्वसामान्य लोकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर व प्राकृतिक उपचार याचे आयोजन केले आहे. या शिबिरासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, पुणे व नाशिक येथून अधिकाधिक लोकांचा सहभाग असणार आहे.