
‘जिजाऊ’च्या मदतीने मंजूरांची होळी गोड
विक्रमगड, ता. ८ (बातमीदार) : विक्रमगड येथील ठेकेदाराने जव्हार तालुक्यातील बोऱ्होटी येथील १८ मजुरांना अंधेरी येथे कामाला नेले होते; मात्र १९ दिवस काम करूनही त्यांच्या मजुरीचे एक लाख २० हजार रुपये न देता या मजुरांना मजुरी बुडवून फसवल्याने या मजुरांची होळी अंधारात जाणार होती. त्यामुळे मजुरांना हा होळी सण गोड जावा यासाठी जिजाऊ संस्थेमार्फत झडपोली येथे नगरसेवक निकेत पडवळे यांच्या हस्ते ५० हजारांची आर्थिक मदत देण्यात आली. या वेळी पीडित मजुरांनी भावूक होऊन जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष नीलेश सांबरे यांचे आभार व्यक्त केले. हा होळीचा सण जिजाऊ संस्थेच्या मदतीने गोड होणार असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
ठेकेदाराने मजुरी बुडवल्याबाबत या मजुरांनी अनेकांकडे न्याय मागण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून पोलिस ठाणे व राजकीय नेत्याचे उंबरठे झिजवले; मात्र न्याय न मिळाल्याने जिजाऊ संस्थेकडे दाद मागितली असता याबाबत जिजाऊ संस्थेने तातडीने दखल घेत जिजाऊ संस्थेमार्फत पालघर पोलिस अधीक्षक यांच्याशी बोलणी करून तातडीने या ठेकेदारावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
---------------------
विक्रमगड येथील एका ठेकेदाराने आम्हाला अंधेरी येथे कामाला नेले होते. १९ दिवस काम करूनही आमची मजुरी न देता आमची फसवणूक केली. आमचा उदरनिर्वाह मजुरीवरच चालतो; मात्र मजुरी न मिळाल्याने होळी सण कसा साजरा करायचा, अशी चिंता असतानाच जिजाऊ संस्थेने आम्हाला मदतीचा हात देत ५० हजाराची आर्थिक मदत देत आमचा होळी सण गोड केला आहे.
- सुमन बांबरे, मजूर, बोऱ्होटी, ता. जव्हार