नेत्रहिन तरुणींचा फुलला सुखाचा संसार

नेत्रहिन तरुणींचा फुलला सुखाचा संसार

उल्हासनगर, ता. ८ (बातमीदार) : आर्थिक कारणास्तव जे लग्न करण्यास असमर्थ असतात अशा नेत्रहीन दिव्यांग मुलींना लग्नाच्या बोहल्यावर चढवून मुलींचे कन्यादान करण्यासाठी उल्हासनगरातील सुशीला पटेल आणि त्यांचे पती जगदीश पटेल हे दाम्पत्य पुढाकार घेत आहेत. जोडप्यांना मंगळसूत्र, कपड्यांसह संसारोपयोगी वस्तूंची भेट देण्यात येत असून हा अनोखा उपक्रम २००२ सालापासून निरंतरपणे राबवण्यात येत आहे.
सामाजिक कार्याची ओढ असणारे जगदीश पटेल आणि त्यांची पत्नी सुशीला पटेल यांनी १७ ऑगस्ट १९८७ मध्ये कॅम्प नंबर चारमधील पाणी पुरवठ्याच्या टाकीजवळ ब्लाइंड वेल्फेअर एसोसिएशन हितकारी संघाची स्थापना केली. नेत्रहीनांचे हित जपण्याचा आणि त्यांना प्रवाहात आणण्याचा सकारात्मक दृष्टिकोन त्यामागे होता. प्रथम संघाद्वारे लहानसहान कार्यक्रम आयोजित करून नेत्रहीनांना एकत्रित करण्यात येऊ लागले. यासाठी संघाचे कार्यालय आधारस्तंभ ठरू लागले.
संघाचे कार्यालय हे रस्त्याकडेला असल्याने या ठिकाणी मोफत औषधे, राशन वितरण, विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य, थंडीत ब्लॅंकेट, पावसाळ्यात रेनकोट, प्लास्टिक वितरण आणि दर शनिवारी भंडारा आदी राबवण्यात येणारे उपक्रम, कार्यक्रम हे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसाठी कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय बनू लागले.

------------------
२००२ मध्ये पहिले कन्यादान
संस्थेच्या माध्यमातून जगदीश पटेल, सुशीला पटेल पालकांच्या भूमिकेत खरे उतरू लागले. नेत्रहीन दिव्यांग तरुण-तरुणींचे लग्न लावून देऊन त्यांना बोहल्यावर चढवण्याचा निर्णय पटेल दाम्पत्याने घेतला. २००२ मध्ये दोन जोडप्यांचे लग्न सर्व नेत्रहीन दिव्यांगांच्या उपस्थितीत लावून दिले. त्यांना मंगळसूत्र, कपड्यांसोबत संसारोपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. हा पायंडा निरंतरपणे राबवताना अनेकदा सामूहिक विवाह सोहळे आयोजित करण्यात येऊ लागले. या अनोख्या उपक्रमामुळे ब्लाइंड वेल्फेअर एसोसिएशन हितकारी संघाचे नाव महाराष्ट्रात झाले. पटेल दाम्पत्याने मागणीनुसार अंधेरीमधील सत्य साईबाबा मंदिरात २४ तसेच गुजरातमधील वडोदरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात २१ नेत्रहीन दिव्यांग मुलींचे कन्यादान करून ४५ दाम्पत्याला लग्नाच्या बोहल्यावर चढवले.

---------------------
आम्ही केवळ निमित्त असून या कामी असंख्य दानी संस्था विविध वस्तूंसाठी मदतीचा हात देतात. त्यामुळे ३०५ नेत्रहीन दिव्यांग मुलींचे कन्यादान करण्याचे भाग्य आम्हास लाभले. कोरोनाच्या काळातही एक हजार १०० नेत्रहीन दिव्यांग परिवाराला रेशनचे किट देऊन त्यांना निराधार होऊ दिले नाही.
- जगदीश पटेल, सुशीला पटेल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com